मेन
फोटो : B12122
इंदिरानगर : नव्या पाइपलाइन साहित्याची पाहणी करताना मंगला नन्नावरे, रूपाली निकुळे यांच्यासह मनपाचे अधिकारी
--
दबावानंतर महापालिका प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर
अखेर नवी पाईपलाईन, आज कामास प्रारंभ ; साहित्याची पाहणी
इंदिरानगर, ता. २४ : प्रभाग क्रमांक २३ मधील इंदिरानगर परिसरातील दूषित पाण्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. यावर तोडगा म्हणून महापालिका प्रशासनाने तातडीने नवीन पाइपलाइन टाकण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठीचे पाईप व इतर साहित्य बुधवारी (ता. २४) परिसरात दाखल झाले. गुरुवारी (ता. २५) सकाळी स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. स्थानिक नगरसेविका तथा पूर्व विभाग सभापती मंगला नन्नावरे आणि रूपाली निकुळे यांनी आज घटनास्थळी जाऊन या साहित्याची प्रत्यक्ष पाहणी केली.
येथील नागरिक ८ जूनपासून दूषित पाण्यामुळे त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर, सोमवारी नगरसेवक चंद्रकांत खोडे, माजी नगरसेवक यशवंत निकुळे आणि प्रकाश नन्नावरे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेत हा प्रश्न ४८ तासांत सोडवण्याचा अल्टिमेटम दिला होता. अन्यथा थेट आयुक्तांच्या कार्यालयात दूषित पाणी घेऊन जाण्याचा इशारा त्यांनी दिला होता. दुसरीकडे, नगरसेविका संध्या कुलकर्णी यांनी थेट आयुक्तांकडे कैफियत मांडत तातडीने चार टँकर मंजूर करून घेतले होते; मात्र हे टँकर वेळेत न पोहोचल्याने नागरिकांना हजारो रुपये खर्च करून विकतचे टँकर घ्यावे लागले होते. मंगळवारी (ता. २३) विनय नगर भागात दूषित पाण्यामुळे पाच जणांना कावीळची लागण झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जाधव यांनी केला होता. त्यानंतर सती आसरा मंदिर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या सोनाली कुलकर्णी यांनी येथील दूषित पाणी चक्क बाटल्यांमध्ये भरून त्याचे पुरावे प्रशासनासमोर सादर केले. या दूषित पाण्यामुळे परिसरातील ५० हून अधिक लोकांना जुलाब-उलट्यांचा त्रास झाला असून काहींना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. यामुळे सामान्य कुटुंबांना लाखोंचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. दूषित पाण्याचा हा विळखा दीपालीनगर, विनय नगर आणि साईनाथ नगर आदी भागात पसरल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. अखेर या चौफेर दबावानंतर महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे.
-- चौकट
असे असेल कामाचे स्वरूप
बापू बंगला ते साईनाथ नगर चौफुली यादरम्यान मुख्य नवीन पाइपलाइन टाकली जाणार आहे. या मुख्य लाइनवरून थेट सिटी गार्डनच्या कोपऱ्यापर्यंत ज्या सोसायट्या आणि बंगल्यांना दूषित पाणीपुरवठा होत आहे, त्यांची ३० ते ३५ वर्षे जुनी कनेक्शन तोडली जातील. त्याऐवजी या नवीन पाइपलाइनमधून त्यांना नव्या जोडण्या दिल्या जाणार आहेत. महापालिका अधिकाऱ्यांनीदेखील युद्धपातळीवर हे काम पूर्ण करण्याचे नियोजन केल्याचे स्पष्ट केले आहे.
---कोट
थेट नवीन पाइपलाइन टाकून जोडण्या देण्यात येणार आहेत. जीर्ण ड्रेनेज लाइन आणि इतर पाण्याच्या पाइपलाइनदेखील बदलण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. अजून कुठे दूषित पाण्याच्या तक्रारी असतील तर नागरिकांनी संपर्क साधावा.
- मंगला नन्नावरे, पूर्व विभाग सभापती