फोटो : B12133
सदिच्छानगर : प्रगतिपथावर असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावाचे काम
--
इंदिरानगरच्या तरण तलाव भागात
इतर खेळांची सुविधा देण्याची मागणी
इंदिरानगर, ता. २५ : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सदिच्छानगर भागात १६ कोटी रुपये खर्चाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव उभारला जात आहे. या परिसरात इतर खेळांसाठी आवश्यक सुविधा आणि महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
१० मार्च २०२४ ला या कामाचा शुभारंभ झाला असून, येत्या काही महिन्यांत हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे. या भव्य तलावाला छत्रपती संभाजी महाराज जलतरण तलाव असे नाव देण्यात आले आहे. ५० मीटर लांबीचा हा तलाव आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार तयार केला जात असून, एकाच वेळी ५०० जण येथे पोहू शकतील. शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर तरण तलाव आणि नाशिक रोडच्या बिटको परिसरातील तलावानंतर हा तिसरा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे. १५ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या इंदिरानगर-पाथर्डी भागातील नागरिकांना क्रीडा सुविधांचा प्राधान्याने लाभ मिळावा, यासाठी याच परिसरात इतर खेळांसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि महिलांसाठी स्वतंत्र वेळ देण्याची मागणी केली जात आहे. आमदार सीमा हिरे यांच्या विकास निधीतून हे काम होत आहे. दरम्यान, नागरिकांच्या या सर्व मागण्या आमदार हिरे यांच्यापर्यंत पोचविल्याची माहिती नगरसेवक तथा भाजप गटनेते ॲड. श्याम बडोदे यांनी दिली.
---कोट
नागरिकांच्या मागण्या माझ्यापर्यंत पोचल्या आहेत. अतिरिक्त सुविधांसाठी आणखी पाच कोटीच्या निधीची मागणी शासनाकडे केली असून, त्याचा पाठपुरावा सुरू आहे.
- सीमा हिरे, आमदार