फोटो : B12673
पाथर्डी फाटा: फुटलेली मुख्य पाइपलाइन
--
पाइपलाइन फुटल्याने
लाखो लिटर पाणी वाया
इंदिरानगर : गुरुवारी (ता. १०) सायंकाळी सहाच्या सुमारास पाथर्डी फाटा भागातील हॉटेल रेडिसन ब्लूसमोर ४५० मिमी व्यासाची पाइपलाइन खोदकाम करणाऱ्या जेसीबीने फोडल्याने अर्ध्या तासात लाखो लिटर पाणी वाया गेले. येथे फायबर केबल टाकण्याचे काम सुरू होते. जेसीबीने आनंदनगर पाण्याच्या टाकीला जोडणाऱ्या मुख्य वाहिनीला फटका मारल्याने ही वाहिनी फुटली. १५ ते २० फूट उंच कारंजे उडत होती. सामाजिक कार्यकर्ते चेतन फेगडे यांनी महापालिकेचे मुख्य अभियंता हेमंत पठ्ठे यांना तातडीने ही माहिती कळवली. कर्मचारी नाना गायकवाड, श्री. बोरीचा, श्री. दगडखेर येथे येऊन व्हॉल्व्ह बंद करेपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले होते. वाया गेलेल्या पाण्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यापूर्वीदेखील ही पाइपलाइन नादुरुस्त झाल्याने मोठ्या प्रमाणात गळती झाल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, तातडीने ही पाइपलाइन दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले आहे. वेळेत काम पूर्ण झाले नाही तर आनंदनगर पाण्याच्या टाकीवरून पाणीपुरवठा होणारा प्रभाग क्रमांक ३१ चा मोठा परिसर प्रभावित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.