01843
पळसन : नाशिक सापुतारा महामार्गावर खड्डे बुजविताना गुजरातमधील सामाजिक कार्यकर्ते.
गुजरातमधील कार्यकत्यांनी बुजविले
नाशिक-सापुतारा महामार्गावरील खड्डे
सकाळ वृत्तसेवा
पळसन, ता. २६ : नाशिक–सापुतारा–वणी महामार्गावरील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. या महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे येथे वारंवार अपघात होत असून अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून याकडे दुर्लक्ष होत राहिले आहे. जे काम महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाने करायला हवे होते, ते काम गुजरात राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत पाच किलोमीटर रस्त्यावरील खड्डे बुजविले.
सापुतारा येथील ''नोटिफाईड एरिया''चे पर्यवेक्षक चिमणभाई पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅराग्लायडिंग व्यवस्थापक मुकेश, मंगेश, विशाल पवार तसेच इतर सहकाऱ्यांनी स्वतःची व्यावसायिक कामे बाजूला ठेवून, महाराष्ट्राच्या हद्दीत येणाऱ्या सापुतारा–ठाणापाडा–हातगड या सुमारे पाच किलोमीटरच्या रस्त्यावरील खड्डे स्वतः श्रमदानातून बुजवले. गुजरातच्या कार्यकर्त्यांच्या या संवेदनशीलतेमुळे अनेक संभाव्य अपघात टळण्यास नक्कीच मदत झाली.
राज्यातील सीमेलगतच्या भागात शेजारील राज्यातील कार्यकर्त्यांना येऊन रस्ते दुरुस्त करावे लागणे, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. यामुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
रस्ते हे विकासाचे प्रतीक मानले जातात; परंतु येथील जीवघेणे खड्डे आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या लाजिरवाण्या घटनेची मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घ्यावी. नाशिक–सापुतारा–वणी महामार्गावरील सर्व खड्डे युद्धपातळीवर बुजविण्याचे आदेश द्यावेत, तसेच या अक्षम्य निष्काळजीपणासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांनी केली.