PML26B10074
पिंपळगाव बसवंत ः आमदार दिलीप बनकर यांना निवेदन देताना ग्रामपंचायत तांत्रिक अधिकारी संघटनेचे पदाधिकारी.
--------------------
ग्रामसभांच्या सुरक्षेसाठी कायदा बदला
महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची आमदार दिलीप बनकर यांच्याकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता.३१ ः ग्रामसभांच्या कामकाजादरम्यान ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे ग्रामसभा शिस्तबद्ध, शांततामय व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात, अशी मागणी ''महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने'' निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्याकडे केली.
वाशिम येथे ग्रामसभेत महिला अधिकाऱ्याला झालेली मारहाण आणि पारोळा (जळगाव) तालुक्यात ग्रामसभेत गोंधळादरम्यान ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने झालेला मृत्यू, या घटनांमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकदा ग्रामसभेत शासकीय कामकाजात अडथळे आणून अधिकाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार घडत असल्याचे संघटनेने आमदारांच्या निदर्शनास आणून दिले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र ठाकरे, तालुकाध्यक्ष नानासाहेब तांबे, तालुका सचिव गणेश शिंदे, कार्याध्यक्ष दिनकर मोरे, कोषाध्यक्ष अमोल भारती, संघटक रवींद्र बाविस्कर, राहुल सोनार, कमलेश सावंत, अभिजित तुपे, मुक्ता गोरे, बापू सोनवणे व संजय बाविस्कर उपस्थित होते.
--------------
१६-१
प्रमुख मागण्या अशा
- संविधानातील अनुच्छेद २४३ व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्रामसभेच्या नियमांचा पुनर्विचार करावा.
- वारंवार ग्रामसभा घेण्याऐवजी वर्षातून एक सर्वसाधारण ग्रामसभा घ्यावी.
- डिजिटल किंवा ऑनलाइन ग्रामसभेला कायदेशीर मान्यता द्यावी.
- योजनांच्या लाभार्थी निवडीसाठी महाडीबीटी प्रणालीचा वापर करावा.
- कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देऊन हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करावी.
------------