पिंपळगाव बसवंतला
६३ मंडळांकडून गणरायाची स्थापना
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता.१५, पोलिस ठाणे अंतर्गत २३ गावांपैकी कारसुळ व मुखेड गावाने ‘एक गाव-एक गणपतीची’ परंपरा कायम राखली आहे. गावात एकोपा ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही गावांनी केला आहे. दरम्यान, शहरात १२ मोठे तर ५१ लहान गणेशोत्सव मंडळ असून निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.
पिंपळगाव बसवंतसह परिसरात गणरायाचे जल्लोषात आगमन झाले आहे. १२ दिवस चालणाऱ्या या उत्सवात पिंपळगाव परिसरातील कारसुळ व मुखेड गावाने एकोप्याचे दर्शन घडविले आहे. दोन्ही गावांमध्ये एक गाव, एक गणपतीची संकल्पना यंदाही राबविण्यात आली आहे.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीख ठरावे या उद्देशाने पिंपळगाव पोलिस ठाण्याने एक गणपतीचे आवाहन केले होते. या आवाहनास मुखेड, कारसुळ गावाने प्रतिसाद दिला आहे. गावातील विविध समाजघटक, तरूण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक एकत्र येत असुन परस्परांमधील सलोखा अधिक दृढ होत आहे. गणेशोत्सव काळात अनावश्यक खर्चाला आळा घालून पर्यावरण पुरक उत्सवाला दोन्ही गावात चालना दिली जात आहे. पिंपळगाव शहरात गणेशोत्सवाची धुम बघायला मिळत आहे. विविध मंडळाने यंदाही धार्मिक देखाव्यावर भर दिली आहे.