PML26B10173
पिंपळगाव बसवंत ः कादवा तिरावरील विसर्जनाच्या तयारीचा आढावा घेताना नगराध्यक्ष डाॅ. मनोज बर्डे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, नीलेश पाटील व पोलिस प्रशासन
-----------------
पिंपळगावला विसर्जनासाठी चोख नियोजन
बॅरिकेडिंग, तराफे, निर्माल्य संकलनासह स्वतंत्र मार्गव्यवस्था; कृत्रिम तलाव वापरण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता.२१ ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती विसर्जनासाठी पिंपळगाव बसवंत नगरपरिषदेने कादवा नदी तीरावर चोख नियोजन केले आहे. बांबूच्या तराफ्याने कादवा पात्रात मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली जाणार आहे. विसर्जनाच्या दिवशी भाविकांची गर्दी लक्षात घेता सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण आणि स्वच्छतेला प्राधान्य देत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
विसर्जन व्यवस्थेची नगराध्यक्ष डॉ. मनोज बर्डे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, शिवसेना गटनेते नीलेश पाटील यांच्यासह नगरपरिषद व अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. विसर्जनस्थळी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना उपनगराध्यक्ष मोरे यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या. यंदाही तराफ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. मोठ्या मूर्तीसाठी क्रेनची व्यवस्था असेल. मूर्तीदान करणाऱ्या भाविकांचा नगरपरिषदेतर्फे सत्कार करण्यात येणार आहे.
विसर्जनस्थळी संपूर्ण परिसरात बॅरिकेडिंग करण्यात येणार असून निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था राहणार आहे. गणेशमूर्ती घेऊन येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र मार्ग, तर विसर्जनानंतर परत जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी एकेरी वाहतूक व्यवस्था प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. नगरपरिषदेतर्फे शहरात चार ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी कादवा नदी तीरावर अनावश्यक गर्दी न करता शक्यतो कृत्रिम तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन करावे असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.
----