मविप्र विद्यापीठ मुद्द्यावर
पिंपळगाव (ब) येथे चर्चा
पवार गटाने घेतला समर्थकांचा मेळावा
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता.१७ : ‘मविप्र’च्या प्रस्तावित विद्यापीठाच्या मुद्द्यावर येथे पवार गटाने निफाड तालुक्यातील प्रमुख नेते व समर्थकांचा मेळावा घेतला. रविवारी (ता.२०) होणाऱ्या वार्षिक सभेत सभासदांनी विद्यापीठाच्या विषयाला स्थगिती ऐवजी रद्द करण्याची भूमिका घ्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
माजी सरचिटणीस नीलिमा पवार, माणिकराव बोरस्ते, ‘मविप्र’चे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, अरविंद कारे, दिलीप मोरे आदी प्रमुख नेते उपस्थित होते. मेळाव्यात पवार, बोरस्ते यांनी गेल्या वार्षिक सभेत विद्यापीठाला सभासदांनी विरोध केलेला असताना विषय स्थगित ठेवून बगल देण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप केला. विद्यापीठाचा प्रस्ताव स्थगित ठेवून सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे हे अट्टहास करीत असल्याचा टीकेचा सूर उपस्थित नेत्यांनी आळविला.
डॉ. ढिकले म्हणाले,‘ मला डावलून सत्ताधारी गटाने गतवर्षीच्या सभेचे इतिवृत्त तयार केले आहे. प्रणव पवार यांनी संस्थेचा शैक्षणिक दर्जा खालावल्याचा दावा करीत मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांची संख्या सेवेअभावी घसरल्याचे सांगितले. भास्करराव बनकर, राजेंद्र डोखळे, प्रा. पी. आर. मोरे, शिवाजी निरगुडे, बाळासाहेब कोल्हे, लहू मोरे आदींनी मनोगत व्यक्त केले. दीपक बोरस्ते यांनी आभार मानले. विलास बोरस्ते यांनी सूत्रसंचालन केले.
मेळाव्याला अमृता पवार, दत्तू डुकरे, बाळासाहेब बनकर, उद्धव निरगुडे, सोमनाथ मोरे, अरविंद जाधव, रत्नाकर कदम, अशोक माळोदे, वैकुंठ पाटील, शहाजी डेर्ले, नवनाथ बोरगुडे, रतन वडघुले, शिवाजी पगार, बाळासाहेब जाधव, अनिल बोरस्ते, चंद्रभान बोरस्ते, संजय मोरे आदीसह सभासद उपस्थित होते.