फोटो-10169
पिंपळगाव बसवंत ः आंदोलन करणाऱ्या सफाई कामगारांशी संवाद साधताना उपनगराध्यक्ष सतीश मोरे. शेजारी राजा गांगुर्डे आदी.
पिंपळगावला सफाई कामगारांचे आंदोलन
उपनगराध्यक्षांच्या आश्वासनानंतर स्थगित
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता. २० ः पिंपळगाव नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी सुधारित वेतन व सेवेत समाविष्ट करून घ्या, यांसह विविध मागण्यासाठी कामबंद आंदोलन पुकारले. मागण्यांवर लवकरच सकारात्मक विचार करू, असे आश्वासन उपनगराध्यक्ष सतीश मोरे यांनी दिल्यानंतर युनियनचे अध्यक्ष राजा गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेले आंदोलन कामगारांनी स्थगित केले.
अग्निशामक केंद्राच्या प्रांगणात पुरुषासह महिला सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन करीत ठिय्या दिला. हातात फलक घेत घोषणाबाजी केली. ठेकेदाराऐवजी नगर परिषदेच्या नियमित सेवेत सामावून घ्या, समान काम व समान दाम याची अमंलबजावणी करा, पीएफ लागू करून दरमहा वेतन पत्रक द्या, ओळखपत्र देऊन सुरक्षा साहित्यांचे वाटप करा, विनाविलंब व निश्चित केलेल्या तारखेला वेदन अदा करा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केले. युनियनचे अध्यक्ष राजा गांगुर्डे यांनी कामगारांच्या मागण्या मांडल्या. त्यावर उपनगराध्यक्ष सतीश मोरे यांनी मागण्यांचा गांभीर्यांने विचार करून शहर स्वच्छ राखण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या कामगारांना दिलासा देऊ असे आश्वासन दिल्यानंतर कामगारांनी आंदोलन थांबविले. आंदोलनात अनिल फासगे, संजय साळवे, महेंद्र बर्वे, किरण दलोड, संकेत दलोड, रेखा झंजोटकर, सरिता बोत, इंदूबाई वाघ, ज्योती अहिरे, उज्ज्वला जाधव, वर्षा गांगुर्डे आदी सहभागी झाले होते.
--------------