PML26B10251
पिंपळगाव बसवंत ः चाकूचा धाक दाखवून लूटमारप्रकरणी अटके केलेल्या दोघांसह पोलिस निरीक्षक गणेश गुरव व कर्मचारी
-------------
२०-१
चाकूचा धाक दाखवून
लूटमार; दोघांना अटक
पिंपळगाव बसवंत ः मुंबई- आग्रा महामार्गावरील पालखेड फाटा परिसरात चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या दोघांना पिंपळगाव बसवंत पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, फोन-पे व्यवहाराशी संबंधित रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण ५२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे ललित राजाराम बर्डे (वय २१, रा. पाचोरेवणी) आणि मोहित उत्तम मोरे (वय १९, रा. आहेरगाव) अशी आहेत.
१३ ऑक्टोबरला रात्री साडेनऊच्या सुमारास पाचोरेवणी शिवारातील पालखेड फाटा येथे ही घटना घडली होती. दोघांनी फिर्यादींना अडवून शस्त्राचा धाक दाखवत त्यांच्याकडील रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन व रोख रक्कम लुटली. फिर्यादीच्या मोबाईलमधील फोन-पे खात्याचा वापर करून त्यांच्या संमतीशिवाय अन्य खात्यांवर पैसे वर्ग केले. या प्रकारात फिर्यादी यांचे एकूण ५२ हजार ७०० रुपयांचे आर्थिक नुकसान झाले होते. पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी लूटमार प्रकरणातील दोघांना अटक केली. संशयितांकडून ६ हजार ७०० रुपये रोख, फोन-पे व्यवहाराशी संबंधित ३६ हजार रुपये आणि अंदाजे १० हजार रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण ५२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक राहुल आव्हाड, पोलीस कर्मचारी विकास वाळुंज, नितीन गाढवे, सागर धात्रक, प्रशांत उगले आणि नीलेश ताडगे यांच्या पथकाने केली.
----