पान दोन मेन
--------------------
07381
देवळाली कॅम्प : शाळेत जाण्यासाठी नाल्यातून वाट काढत जाताना विद्यार्थी.
शाळेसाठी शिंगवे बहुला येथे विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
नाल्यातून काढली लागत आहे वाट; ३५० वरून पटसंख्या अवघी ५० वर
सकाळ वृत्तसेवा
देवळाली कॅम्प, ता. १ : देवळाली छावणी परिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील शिंगवे बहुला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना चक्क नाल्यातून वाट काढत जावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यास विद्यार्थ्यांचा शाळेचा मार्गच बंद होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.
शाळेपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर असलेल्या चारणवाडी (पाषाणनगर) वस्तीत सुमारे एक हजार लोकसंख्या आहे. या वस्तीतून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिंगवे बहुला येथील जि. प. शाळेत येत होते. मात्र, रस्ताच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना नाल्यातून व झाडी-झुडपांतून कसरत करत जावे लागत आहे. पुराच्या वेळी अपघात टाळण्यासाठी पालकांनी मुलांना शाळेत पाठवणे कमी केले असून, काहींनी तीन किलोमीटर अंतरावरील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. शिक्षकांनी स्वखर्चाने व शिवयुवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी व्हॅनची सुविधा सुरू केली होती. मात्र, कायमस्वरूपी रस्त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, असे पालकांचे म्हणणे आहे.
३५० वरून पटसंख्या ५० वर
काही वर्षांपूर्वी या शाळेची पटसंख्या ३५० पेक्षा अधिक होती. रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना तीन किलोमीटरचा फेरा मारावा लागत असून, परिणामी शाळेची पटसंख्या अवघ्या ५० वर आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्राम सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोजाड यांनी केली आहे.
तरच वाढेल पटसंख्या
नाल्यावर पूल किंवा सुरक्षित रस्ता उपलब्ध झाल्यास पाषाणनगरसह परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुलभ होईल आणि घटलेली पटसंख्या पुन्हा वाढेल, असा विश्वास शिक्षक व पालकांनी व्यक्त केला आहे. प्रशासनाने यावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.