पान-२ मेन
--------
PTH26B01881
पेठ ः शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिराळाकुंड तलावाकडे पाणी जाणाऱ्या अर्धवट बांधकाम झालेल्या गटारी.
------------
पाणीपुरवठ्याच्या तलावातच सांडपाणी
--------------
पेठ शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात ः गटारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, साथींचे आजार
--------------
सकाळ वृत्तसेवा
पेठ, ता.१ : पेठ शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या शिराळकुंड साठवण बंधाऱ्यातच शहरातील उत्तरेकडील गटारींचे व ओढ्यांचे दूषित सांडपाणी थेट मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे पेठ शहरात साथीचे आजार पसरत आहेत. या गंभीर बाबीत लक्ष घालून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
--------------
पेठ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे पंधरा वर्षापूर्वी शहरापासून दीड किलोमीटरवर शिराळकुंड साठवण तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावामुळे शहराची पाणीटंचाई दूर झालीच, शिवाय परिसरातील शेतीला मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांची मोठी प्रगती झाली. मात्र, सध्या सुमारे १० हजार लोकसंख्या असलेल्या पेठ शहराला पाणी पुरवणाऱ्या या तलावात शहरातील लहान-मोठ्या सहा ओढ्यांचे मलमूत्र मिश्रित पाणी थेट जात असल्याने हा जलस्त्रोत दूषित झाला आहे. पावसाळ्यात तर गाळमिश्रित आणि दूषित पाण्याने कहर केल्या अनेक दिवस गढूळ पाण्याचा पुरवठा होत होता.
----------
नगरपंचायतीने शहरात बहुतांश ठिकाणी सांडपाण्यासाठी गटारींची कामे पूर्ण केली खरी, मात्र या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावता हा प्रवाह शिराळकुंड धरणाच्या दिशेनेच जात आहे. त्यातच अनेक नागरिकांनी शौचालयांचे ओव्हरफ्लो व बाथरूमचे पाईप थेट गटारींमध्ये जोडल्याने दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी थेट पिण्याच्या पाण्याच्या साठ्यात मिसळत आहे.
--------
१६-२ चौकट
सतरा कोटींची योजना, पण पाण्याचे काय?
सध्या पेठ शहरासाठी तब्बल १७ कोटी रुपयांची नवी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून, शहरात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. रस्ते खड्डेमय झाले असले तरी एका बाजूला एवढा मोठा निधी खर्च होत असताना, दुसऱ्या बाजूला दरवर्षी पावसाळ्यात मूळ तलावात मिसळणाऱ्या या दूषित सांडपाण्यावर कोणतीही उपाययोजना आखली जात नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे पाणी तलावाच्या बाजूने अन्यत्र वळवून पिण्याचे पाणी सुरक्षित ठेवावे, अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
--------------