फोटो : B10076, B10077
सातपूर : कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने करताना सीटूचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
कामगारविरोधी श्रमसंहितांची ‘सीटू’कडून होळी
सातपूरला कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने
सातपूर, ता. १५ : केंद्र व राज्य सरकारने लागू केलेल्या चार कामगारविरोधी श्रमसंहितांच्या निषेधार्थ ‘सीटू’ संघटनेतर्फे सातपूर येथील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर गुरुवारी (ता. १५) तीव्र निदर्शने करण्यात आली. या वेळी नव्या कायद्यांच्या प्रतीकात्मक प्रतीची होळी करून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवण्यात आला. यासंदर्भात कामगार उपायुक्त संदिप पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
केंद्र व राज्य सरकार मोठे उद्योगसमूह आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या फायद्यासाठी कामगारांचे हक्क पायदळी तुडवत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. नव्या श्रमसंहितांमुळे रोजगाराची सुरक्षितता धोक्यात येणार असल्याने त्या तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, धुमाळ इंडस्ट्रीजमधील कामगारांच्या बेमुदत धरणे आंदोलनालाही या वेळी सीटूने जाहीर पाठिंबा दिला.
कामगारांना मार्गदर्शन करताना सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट केली, तर जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळे यांनी प्रलंबित मागण्यांवर भाष्य केले.
या आंदोलनात सतीश खैरनार, संतोष काकडे, अरविंद शहापुरे, राहुल गायकवाड, प्रकाश कोळी, मोहन जाधव, युवराज पाटील, आत्माराम डावरे, सचिन मालेगावकर, संजय पवार, पांडुरंग काटकर यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते.