पान तीन
--------------------
10608
सातपूर : प्रभाग समिती बैठकीत प्रश्न मांडताना नगरसेवक.
प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नगरसेवक आक्रमक
सातपुर प्रभाग समिती बैठकीत अधिकाऱ्यांना खुर्ची खाली करण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
सातपूर, ता. २१ : परिसरातील पाणी, ड्रेनेज, रस्ते, अतिक्रमण, मोकाट कुत्रे-गाई आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार या प्रश्नांवरून सातपूर प्रभाग समितीची बैठक चांगलीच गाजली. जर नागरिकांच्या समस्या सोडवता येत नसतील, तर अधिकाऱ्यांनी खुर्ची खाली करावी, अशी संतप्त मागणी नगरसेवकांनी केली.
प्रभाग सभापती समाधान देवरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.२१) सकाळी झालेल्या प्रभाग सभेत सुरुवातीपासूनच लोकप्रतिनिधींनी नागरी समस्यांचा पाढा वाचत प्रशासनाला धारेवर धरले. नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी मोकाट कुत्र्यांच्या समस्येवरून प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. ड्रेनेज लाइन फुटल्याने नागरिकांच्या घरांसमोर सांडपाणी साचून दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. ही समस्या तातडीने सोडविल्या नाहीत तर अधिकाऱ्यांना उचलून ड्रेनेजच्या पाण्यात बुडवू, गुन्हा दाखल झाला तरी चालेल, असा इशारा इंगोले यांनी दिला.
नगरसेविका सविता काळे यांनी प्रभागातील गढूळ पाण्याचा प्रश्न मांडला. यावर पाणीपुरवठा अधिकारी सूर्यकर यांनी गढूळ नाही, तर दूषित पाणी येत असल्याचे मान्य केले. नगरसेविका संगीता घोटेकर यांनी मोकाट कुत्र्यांच्या झुंडी वाढल्याचे सांगत वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप केला.
बैठकी सर्व समस्या जाणून घेतल्यावर सभापती समाधान देवरे यांनी सर्व समस्यांची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना कामकाजात सुधारणा करून प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. यावेळी महिला व बालकल्याण समिती सदस्यपदी इंदुबाई नागरे आणि भारती धिवरे यांची निवड करण्यात आली. बैठकीला विश्वास नागरे, नितीन निगळ, अंकिता शिंदे, माधुरी बोलकर, नयना जाधव, सविता काळे, मनासी शेवरे, विभागीय अधिकारी सुनील राजभोज यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
-------
अतिक्रमण आणि अनधिकृत प्रकल्पांचा मुद्दा
नगरसेविका उषा बेडकुळे यांनी रो-हाऊस बांधकामामुळे नियोजित ९ मीटरचा रस्ता अतिक्रमणामुळे ७ मीटरवर आल्याचा मुद्दा उपस्थित करत नगररचना विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच गंगापूर रोडवरील बेडकुळे मळा परिसरात खासगी बिल्डरकडून अनधिकृत आरएमएस प्रकल्प सुरू असून, त्यातून प्रदूषण होत असल्याचा आरोप त्यांनी केला.