‘एनसीएमसी’ कार्डसाठी मुदत द्या
एसटीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सोनगीर, ता. २ ः राज्य परिवहन महामंडळाने १ सप्टेंबरपासून महिलांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य केले आहे. बहुतांश ग्रामीण भागातील महिलांकडे हे कार्ड नसल्याने पहिल्याच दिवशी प्रवास करताना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे काही बसमध्ये वादाचे प्रसंग निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर असंख्य लाभार्थींकडे कार्ड नसल्याने एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी किमान दोन महिने मुदत द्यावी, तोपर्यंत महिलांना व पुरुष लाभार्थ्यांना प्रवासासाठी कार्ड अनिवार्य करू नये, अशी मागणी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष हसन खाँ पठाण यांनी केली आहे.
राज्यशासनाने १७ मार्च २०२३ पासून महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांसाठी राज्यभरात परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करण्यासाठी ५० टक्के सवलत दिली. याशिवाय ६५ ते ७५ वर्षावरील पुरुषांनादेखील ही सवलत लागू केली. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजना सुरू आहे. दरम्यान, राज्य शासनाने महिला व ६५ ते ७५ वयोगटांतील पुरुषांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य केले आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना काही काळ सूट देण्यात आली. दरम्यान, ग्रामीण भागात पुरेसा प्रचार-प्रसार न झाल्याने अनेक पात्र लाभार्थी महिला व पुरुषांनी एनसीएमसी कार्डच बनविले नाही. काहींना योजनेबद्दल माहिती नाही. शहरी भाग व खेड्यात गर्दीमुळे काहींना सवलत कार्ड काढता आले नाही. तर काहींचे अद्याप कार्ड मिळालेले नाही. यापार्श्वभूमीवर अचानक १ सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्ड नसल्यास प्रवासात सवलत मिळणार नाही, असे जाहीर झाल्याने अनेकांची त्रेधा उडाली आहे. १ व २ सप्टेंबर बसमध्ये प्रवास करताना अनेक महिलांना पूर्ण तिकिटाचा आर्थिक भुर्दंड बसला. त्यामुळे कार्ड अनिवार्य करण्याची मुदत दोन महिने वाढवावी, अशी मागणी हसन खाँ पठाण यांनी केली आहे.
---
कोट
ग्रामीण भागात निम्मेहून अधिक महिलांनी एनसीएमसी कार्ड काढलेले नाही. कार्ड मिळण्यासाठी किमान १५ ते २० दिवस लागतात. त्याचाही फटका काहींना बसला आहे. त्यामुळे राज्यशासनाने एनसीएमसी कार्ड अनिवार्यता एक किंवा दोन महिने पुढे ढकलावी.
- रूपाली माळी,
पंचायत समितीच्या माजी सदस्या, सोनगीर