बिबट्याच्या हल्ल्यात
दोघे बचावले
सोनगीर, ता. ७ : सोंडले (ता. शिंदखेडा) येथील दोन भावांवर अचानक आलेल्या बिबट्याने हल्ला केला. मात्र, त्यांनी चतुराईने स्वतःचा बचाव करून घेतल्याने अनर्थ टळला. हे दोन्ही भाऊ रविवारी (ता. ७) रात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते.
या पार्श्वभूमीवर सोंडले शिवारातील शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या धुळ्याच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिलेे असून, त्यात रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी केली आहे.
सोंडले येथील रामा सोमा ठेलारी आणि सतीश सोमा ठेलारी हे दोघे भाऊ शेतात रात्री पिकांना पाणी देण्यासाठी दुचाकीने जात असताना, शेताच्या बांधाआड दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्या दिशेने झेप घेतली. दरम्यान, आपल्या शिवारात बिबट्याचा वावर आहे, याची पूर्वकल्पना दोघा भावांना असल्याने त्यांनी प्रसंगावधान दाखवत बिबट्याच्या दिशेने अंगावरील चादर फेकून दिल्याने बिबट्या बिथरला आणि पळून गेला. या चतुराईमुळे दोघा भावांचा जीव वाचला. मात्र, या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. सोंडले परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने रात्री पिकांना पाणी देणे धोकेदायक आहे. त्यामुळे ‘महावितरण’ने सोंडले फिडरवर रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.