पान एक
------------
सोनगीरमध्ये जन्मदात्या बापाचा लेकींवर हल्ला
एकीचा उपचारात मृत्यू, दुसरी गंभीर; गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
सोनगीर, ता. १२ : येथील बारी परिसरात राहणाऱ्या व मानसिक संतुलन बिघडलेल्या एका इसमाने स्वतःच्या दोन मुलींवर काचेच्या बाटलीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात उपचारादरम्यान एका मुलीचा मृत्यू झाला तर दुसरीवर उपचार सुरू आहे. शनिवारी (ता. १२) सकाळी फॉरेन्सिक टीम आणि सोनगीर पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला.
सेंधवा (जि. बडवाणी, मध्य प्रदेश) येथील मूळ रहिवासी असलेले सोलंकी गावी जात असताना शुक्रवारी (ता. ११) सकाळी दिनेश आसाराम सोलंकी (वय २१) याने वाहनातच पत्नी राधिका सोलंकी आणि त्याच्या मुली नित्या (वय २) व दिव्या (वय ४) यांना अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाहनचालकाने त्यांना मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगीर बारी परिसरात उतरवून दिले.
यामुळे दिनेशने पत्नीकडे धाव घेतली. पत्नी राधिका जीव वाचवून पळाली, मात्र दोन्ही निष्पाप मुली त्याच्या तावडीत सापडल्या. त्यानंतर दिनेशने जवळच असलेल्या पुलाखाली ओढत नेऊन तेथे पडलेल्या काचेच्या बाटलीने दोन्ही मुलींच्या डोक्यावर सपासप वार केले. घटनेनंतर दोन्ही मुली रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडल्या. घाबरलेल्या राधिकाने नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने जखमी मुलींना हिरे मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी हलवले. तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना दिव्या हिचे निधन झाले, तर नित्यावर उपचार सुरु आहे.
संशयितावर गुन्हा दाखल
दरम्यान, संशयित दिनेश सोलंकी यांच्यावर जिल्हा रुग्णालयात पोलिसांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पत्नी राधिका दिनेश सोलंकी हिच्या जबाबावरून संशयित पती दिनेश आसाराम सोलंकी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.