बनावट दारूच्या गुन्ह्यातील संशयित फरारी
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हातावर तुरी; चर्चेला ऊत
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. १४ : बनावट दारूच्या कारखान्यातून ताब्यात घेतलेल्या संशयिताने २४ तासांच्या आत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. याबाबत वेेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे.
आंबाडूकपाडा (गधडदेव, ता. शिरपूर) येथे झोपडीत सुरू असलेल्या बनावट मद्याच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी (ता. १३) सकाळी सातला छापा टाकला होता. बनावट दारू, स्पिरीट व चारचाकी वाहन, असा एकूण सात लाख ३६ हजारांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला होता. संशयित अजयसिंह उखळदे, मनोहर पिंपळदे, मोगा मुसळदे (तिघे रा. सुलतानपूर, ता. शहादा) यांना अटक केली. त्यांना येथील न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. त्यानंतर रात्री साडेअकराला अधिक चौकशीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी त्यांना हाडाखेड (ता. शिरपूर) येथील कार्यालयात घेऊन गेले. तेथून त्यांना पळासनेर येथील कारागृहात अधिकारी घेऊन जात होते. मात्र, गाडीत बसताना संशयितांपैकी मोगा मुसळदे याने नैसर्गिक विधीचा बहाणा सांगितला. त्याला कार्यालयामागील बाजूस घेऊन गेले असता, तेथील कंपाउंडवरून उडी टाकून तो फरारी झाला. त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, तो अंधारात फरारी झाला. निरीक्षक देवीदास नेहुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगवी पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.
तीन संशयित, दोन कर्मचारी
नेहुल यांनी फिर्यादीत ते व जवान काशीनाथ गोसावी संशयितांना घेऊन जात असल्याचे म्हटले आहे. तीन संशयितांसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दोन कर्मचारी पुरेसे होते का? अपरात्री संशयितांची वाहतूक करणे सुरक्षित होते का? हाडाखेड येथील कार्यालयात स्वच्छतागृह नव्हते का, असे अनेक प्रश्न यानिमित्त उपस्थित झाले असून, फरारी संशयिताला अटक झाल्यानंतर त्याचा उलगडा करण्यासाठी वरिष्ठांनी चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.