(पान ४ ला मेन)
SHC26B13290
शिरपूर : प्रारूप मतदार यादीबाबत माहिती देताना प्रांताधिकारी डॉ. शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी.
--------
शिरपूर मतदारसंघात ३२ हजार मतदारांची घट
डॉ. शरद मंडलिक यांची माहिती; चार मतदान केंद्र वाढली
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. ३१ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर- २०२६) अंतर्गत शिरपूर (अ. ज.) विधानसभा मतदारसंघात यापूर्वीच्या मतदार यादीच्या तुलनेत ३२ हजार ६०२ मतदारांची घट झाली आहे. तर मतदान केंद्रांच्या संख्येत चारने वाढ झाली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी यांनी सोमवारी (ता. ३१) दिली.
------
‘एसआयआर- २०२६’ अंतर्गत १ ऑक्टोबर २०२६ ही अर्हता दिनांक धरून मतदार यादीचे सखोल पुनरीक्षण करण्यात आले आहे. या प्रक्रियेनंतर शिरपूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या ३३६ वरून ३४० इतकी झाली आहे. पूर्वीच्या मतदार यादीत एकूण तीन लाख ५१ हजार १८६ मतदार होते. त्यामध्ये एक लाख ७६ हजार २७२ पुरुष, एक लाख ७४ हजार ९०८ महिला आणि सहा तृतीयपंथी मतदारांचा समावेश होता. प्रारूप मतदार यादीत एकूण तीन लाख ७ हजार २३६ मतदार असून, त्यात एक लाख ५६ हजार ३८८ पुरुष, एक लाख ५० हजार ८४२ महिला आणि सहा तृतीयपंथी मतदार आहेत.
पुनरीक्षण प्रक्रियेत १८ हजार ४६४ मतदारांच्या नोंदींमध्ये विसंगती आढळल्या असून, १४ हजार १३८ मतदारांची नो मॅपिंग नोंद झाली आहे. तसेच, एकूण ३२ हजार ६०२ मतदारांच्या नोंदींवर सुनावणी आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या प्रक्रियेत चार नवीन मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये मतदान केंद्र क्र. ३८- खाऱ्या दोंदवाडा, मतदान केंद्र क्र. १०३- आंबाफाटा, मतदान केंद्र क्र. १३८- नवी सांगवी आणि मतदान केंद्र क्र. ३२८- सावेर यांचा समावेश आहे.
प्रांताधिकारी डॉ. शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी, निवडणूक नायब तहसीलदार आर. पी. कुमावत यांनी मतदारांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव, पत्ता व इतर तपशील तपासून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे अथवा हरकती दाखल करण्याचे आवाहन केले आहे.
------
दावे- हरकतींसाठी
३० सप्टेंबरची मुदत
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. प्राप्त दावे व हरकतींबाबत ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नोटिसा देऊन सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा करण्यात येणार आहे. ‘एसआयआर- २०२६’ ची सुधारित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ ला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.