SHC26B13297
शिरपूर : दीक्षांत सोहळ्यात विद्यार्थ्यांसोबत अरुण नंदा, डॉ. सुनीता पाटील, राजगोपाल भंडारी व सहकारी.
-------
बदलांशी जुळवतांना सामाजिक मूल्यांचे भान ठेवा
अरुण नंदा : एनएमआयएमएसच्या ३३१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. ३१ : कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, शाश्वतता आणि डिजिटल परिवर्तनामुळे व्यावसायिक क्षेत्रात वेगाने बदल घडत आहेत. या बदलांशी जुळवून घेत असतांना सामाजिक मूल्यांचे भान ठेवा आणि मूल्यांची जपणूक करणारा समाज घडवा, असे आवाहन महिंद्रा हॉलिडेज ॲन्ड रिसॉर्ट इंडिया लि. चे माजी कार्यकारी संचालक तथा अध्यक्ष अरुण नंदा यांनी केले.
येथील एस.व्ही.के.एम. नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एनएमआयएमएस) शिरपूर कॅम्पसचा १६ वा दीक्षांत समारंभ नुकताच झाला. त्यावेळी ते बोलत होते. संचालक राजगोपाल भंडारी अध्यक्षस्थानी होते.
श्री. नंदा म्हणाले, बदलत्या काळात कर्तव्य, नीतीमूल्ये, सातत्याने शिकण्याची वृत्ती आणि सामाजिक जबाबदारी यांना महत्त्व देणे आवश्यक आहे. आपल्याला एक नीतीमान समाज तयार करावयाचा आहे. त्यासाठी युवकांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. संचालिका डॉ. सुनीता पाटील यांनी अहवाल सादर करतांना शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, नवोन्मेष, उद्योग क्षेत्राशी संलग्नता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना शाश्वततेची शपथ देतांना नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, समानता, सामाजिक जबाबदारी आणि उत्तरदायित्व यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन करण्यात आले.
अकॅडमिक ॲन्ड स्पोर्ट्स अॅन्युअल रिपोर्ट २०२५-२६ चे प्रकाशन करण्यात आले. एमपीएसटीएमईचे २५२, एसपीटीएमचे ४३, एसएएसटीचे २६ आणि स्कूल ऑफ कॉमर्सचे दहा विद्यार्थ्यांना पदवीदान करण्यात आले. प्रशासकीय अधिकारी शिवाजी गायकवाड, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयोजन केले. पदवीपात्र विद्यार्थ्यांचे एसव्हीकेएम संस्थेचे अध्यक्ष व एनएमआयएमएस अभिमत विद्यापीठाचे कुलपती आमदार अमरिशभाई पटेल, सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, राजगोपाल भंडारी, शिरपूर कॅम्पस प्रभारी रिटा पटेल यांनी कौतुक केले.