SHC26B13316
शिरपूर : विजेत्या मंडळांना पारितोषिक प्रदान करताना आमदार काशीराम पावरा, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल आदी.
-----------
गणेशोत्सवाचे पावित्र्य कायम राखा
चिंतनभाई पटेल : आदर्श गणेश मंडळांसाठी नगराध्यक्षांकडून लाखोंचे प्रोत्साहन
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. ४ : श्री गणेश बुद्धीदात्री देवता आहे. प्रत्येक कार्याचा शुभारंभ श्री गणेशाच्या आराधनेने केला जातो. अशा देवाचा उत्सव पावित्र्य राखून आणि शांततेने साजरा करावा, असे आवाहन नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांनी केले.
येथील चिंतनभाई पटेल युवा प्रतिष्ठानतर्फे २०२५ मधील श्री गणेश मंडळांसाठी आयोजित स्पर्धेचे पारितोषिक वितरण गुरुवारी (ता. ३) सायंकाळी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार काशीराम पावरा अध्यक्षस्थानी होते. बांधकाम सभापती वासुदेव देवरे, शिक्षण सभापती श्यामकांत ईशी, पाणीपुरवठा सभापती गणेश सावळे, नगरसेवक राजसिंह सिसोदिया, पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, निवृत्त निरीक्षक अन्साराम आगरकर, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष पिंटू माळी, संतोष माळी, माझा खानदेश प्रतिष्ठानचे महेंद्र माळी आदी उपस्थित होते.
लाखोंची पारितोषिके
२०२६ मधील आदर्श गणेश मंडळांसाठी श्री पटेल यांनी प्रतिष्ठानतर्फे सुमारे अडीच लाख रुपयांची पारितोषिके जाहीर केली. प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपये, द्वितीय क्रमांसाठी ७५ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी ५० हजार रुपये, तर चतुर्थ क्रमांकासाठी २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. शासनाचे नियम व सामाजिक संकेतांचे पालन गणेश मंडळांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार पावरा यांनी गणेशोत्सवात डीजेंची चढाओढ करु नये, मध्यम उंचीच्या श्रीमूर्ती स्थापन कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. परदेशी यांनी गणेश मंडळांना शासकीय नियमांची माहिती दिली. आगरकर यांनी गणेशोत्सवात कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. प्रवीण शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. महेंद्र माळी यांनी आभार मानले.
------
२०२५ च्या गणेशोत्सवातील
पारितोषिक विजेते मंडळे अशी
प्रथम महात्मा फुले युवा मंच गणेश मंडळ, वरवाडे (पावनखिंड देखावा), द्वितीय सिद्धीविनायक गणेश मंडळ, सिद्धीविनायक कॉलनी (वैष्णोदेवी देखावा), तृतीय करवंद नाका परिसर गणेश मंडळ (वटसावित्री महत्त्व), चतुर्थ श्रीमंत रिद्धीसिद्धी गणेश मंडळ, आशीर्वाद चौफुली (श्री खाटू श्याम देखावा).