SHC26B13318
शिरपूर : बंधाऱ्याच्या भूमिपूजनप्रसंगी भूपेशभाई पटेल व पदाधिकारी.
-----
शिरपूर पॅटर्न ही पुढील पिढीसाठी गुंतवणूक
भूपेशभाई पटेल : ४७२ व्या बंधाऱ्याचे आंबे येथे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. ४ : पाणी ही सर्वोत्तम संपत्ती आहे. शेती आणि पिण्यासाठी मुबलक पाणी असेल तरच शेतकऱ्यांसह सर्व घटक सुखी होतील. आपल्या पिढीने पाण्यामुळे झालेली किमया अनुभवली. आता शिरपूर पॅटर्न बंधाऱ्यांच्या मालिकेतून पुढील पिढ्यांसाठी गुंतवणूक करीत आहोत, अशी माहिती प्रियदर्शिनी सूतगिरणीचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी दिली.
आंबे (ता. शिरपूर) गावाजवळ शिरपूर पॅटर्न बंधाऱ्यांच्या मालिकेतील ४७२ व्या बंधाऱ्याचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सुभाष कुलकर्णी, आर. आर. माळी, शिरपूर पॅटर्नचे प्रकल्प संचालक टी. आर. दोरीक, सरपंच प्रीतम पावरा, गेंदराम पावरा, ईदला पावरा, रमेश पावरा, बिरसिंह पावरा, काशीराम पावरा, चत्तरसिंह पावरा, गणेश माळी, कृष्णा पावरा आदी उपस्थित होते.
श्री कुलकर्णी म्हणाले की, आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली १५ वर्षांपासून शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून तालुक्यात व्यापक जलसंधारणाची कामे सुरू आहेत. पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे, भूजलसाठा वाढविणे आणि शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाण्याचा आधार देणे, या उद्देशाने या उपक्रमाची सातत्याने वाटचाल सुरू आहे.
श्री. दोरीक म्हणाले, बंधाऱ्याच्या कामातून निघणाऱ्या मातीचा उपयोग परिसरातील शेतकऱ्यांच्या पाणंद रस्त्यांसाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे जलसंधारणासोबतच शेतकऱ्यांना वाहतुकीची सुविधाही मिळून त्यांची वाहने थेट शेतापर्यंत नेता येतील. त्यामुळे शेतीमालाची वाहतूक, कृषी साहित्याची ने- आण आणि दैनंदिन शेतीची कामे अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.