सावळदे येथे
शिपायाला शिवीगाळ
शिरपूर : सावळदे (ता. शिरपूर) येथील ग्रामपंचायत शिपायाला चाकू व लोखंडी कड्याने मारहाण केल्यावरून तिघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ४ सप्टेंबरला रात्री नऊला सावळदे येथील बसथांब्याजवळ घडली. शिपाई विनोद रतन सोनवणे (वय ३०) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याने संशयितांना रस्त्यावर शिवीगाळ का करता, असे विचारल्याचा राग आल्याने संशयितांनी त्याला मारहाण केली. जितेंद्र सुकलाल कोळी, ओम जितेंद्र कोळी व लकी जितेंद्र कोळी (सर्व रा. सावळदे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून हवालदार प्रमोद ईशी तपास करीत आहेत. याच प्रकरणात, जितेंद्र सुकलाल कोळी (वय ४२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विनोद रतन सोनवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, हवालदार दुसाणे तपास करीत आहेत.
---
आत्महत्येस प्रवृत्त
केल्याचा दोघांवर गुन्हा
शिरपूर : सातत्याने मानसिक त्रास देऊन २० लाख रुपयांची खंडणी मागून प्रौढास आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याच्या वादातून दोघांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रवीण भिमराव पाटील (रा. बोराडी) असे आत्महत्या करणाऱ्या प्रौढाचे नाव आहे. त्यांचा मुलगा गणेश पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याचा भाऊ शुभम याने एका मुलीसोबत मोबाईलवर चॅटींग केल्यावरून २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान संशयित अमोल तथा सागर पांडुरंग पाटील व रवींद्र काशीनाथ मोरे (दोघे रा. बोराडी) त्याच्या घरी जाऊन मोबाईल हिसकावून त्याची आई व काका यांना मारहाण करून शिवीगाळ करीत होते. प्रवीण पाटील यांना मानसिक त्रास देऊन त्यांच्याकडे २० लाख रुपयांची खंडणी मागत होते. या त्रासाला कंटाळून पाटील यांनी आत्महत्या केली. उपनिरीक्षक मिलिंद पवार तपास करीत आहेत.