SHC26B13393
पिंप्री (ता. शिरपूर) : महाआरती करताना नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल. शेजारी ग्रामस्थ.
-------
ग्रामस्थांच्या एकोप्यातून होईल ग्रामविकास
चिंतनभाई पटेल : पिंप्री येथे ‘एक गाव- एक गणपती’ उपक्रमात महाआरती
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. २१ : ग्रामस्थांच्या एकजुटीत खूप मोठी ताकद असते. गावाने एकमताने केलेला विचार आणि कृती यामधून अफाट विकासकामे साकारली आहेत. महाराष्ट्रात ग्रामस्थांच्या एकोप्याची आदर्श परंपरा असून, त्यातूनच खऱ्या अर्थाने ग्रामविकासाचे स्वप्न पूर्ण होईल, असे मत नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांनी व्यक्त केले.
पिंप्री (ता. शिरपूर) येथे ‘एक गाव- एक गणपती’ संकल्पनेंतर्गत युवा प्रतिष्ठानतर्फे सुरू असलेल्या गणेशोत्सवात श्री. पटेल यांच्या हस्ते नुकतीच श्रींची महाआरती करण्यात आली. त्यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. थाळनेरचे माजी सरपंच प्रशांत पाटील, सावळदे येथील सरपंच सचिन राजपूत, महेंद्र बाविस्कर, राकेश पाटील, रवी तंवर, राज देशमुख, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष संदीप कुंवर, पिंप्रीचे सरपंच महेंद्र सिसोदिया, पोलिस पाटील जयपालसिंह गिरासे, माजी सरपंच प्रवीण राजपूत, आर. डी. पाटील, वासुदेव गिरासे, संजय धनगर आदी उपस्थित होते.
४० वर्षापासून बिनविरोध निवडणुकीची परंपरा, तंटामुक्त गाव पुरस्कार व एक गाव एक गणपतीसारख्या आदर्श संकल्पना राबवल्याबद्दल श्री. पटेल यांनी पिंप्री ग्रामस्थांचे कौतुक केले. महेंद्र सिसोदिया, जयपालसिंह गिरासे, मंडळाचे अध्यक्ष मनोज राजपूत यांनीही मनोगत व्यक्त केले. युवा प्रतिष्ठान, एकता नवयुवक मित्र मंडळ आणि वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह मित्र मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संयोजन केले.