SKD26B03998
भडणे : विद्यार्थिनींच्या पालकास अपघात विमा रकमेचा धनादेश सुपूर्द करताना कुणाल पाटील, प्रफुलकुमार सिसोदे, प्राचार्य डॉ. एन. एस. पवार आदी.
--------
विद्यार्थिनीच्या कुटुंबाला विमा योजनेतून आर्थिक मदत
अपघातात मृत्यू झालेल्या प्रियंका कोळीच्या पालकांना चार लाखांचा धनादेश प्रदान
सकाळ वृत्तसेवा
शिंदखेडा, ता. १४ : येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रथम वर्ष विज्ञान शाखेची विद्यार्थिनी प्रियंका रावसाहेब कोळी (रा. भडणे) हिचा जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर महाविद्यालय प्रशासन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या पुढाकाराने विद्यार्थिनीच्या कुटुंबाला सामूहिक विमा योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्यात आली.
महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांचा सामूहिक विमा उतरविण्यात आलेला असल्याने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार विमा कंपनीने सर्व प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थिनीच्या पालकांसाठी चार लाख रुपयांची मदत मंजूर केली. तसेच, विद्यापीठाच्या कुलगुरू वैद्यकीय सहाय्यता निधीतून दहा हजार रुपयांची अतिरिक्त मदतही मंजूर करण्यात आली. मदतीची रक्कम संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते विद्यार्थिनीचे वडील रावसाहेब कोळी यांना धनादेशाद्वारे प्रदान करण्यात आली.
या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रफुल्लकुमार सिसोदे, एस. टी. पाटील, महाविद्यालयाचे उपाध्यक्ष अशोक पाटील, स्थानिक कार्यकारिणीचे ज्येष्ठ संचालक सुरेश देसले, प्राचार्य डॉ. एन. एस. पवार, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. बोरसे, डॉ. व्ही. एस. पवार, उपप्राचार्य एस. टी. राऊळ, कार्यालय अधीक्षक राहुल पाटील, ग्रामस्थ, पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. उमेशकुमार खैरनार यांचे मार्गदर्शन लाभले.