SKD26B04066
शिंदखेडा : पत्रकार परिषदेत बोलताना उपनगराध्यक्ष उदय देसले, बांधकाम सभापती मनोहर पाटील, भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी.
-----------
फिरनिविदा काढून तातडीने काम सुरू करण्याची भूमिका
भाजपचा आरोप; नगराध्यक्षांच्या गटाकडूनच विकासकामांमध्ये अडथळे
सकाळ वृत्तसेवा
शिंदखेडा, ता. २६ : येथील नगरपंचायतीमधील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमधील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती माळी यांनी भाजपच्या नगरसेवकांवर केलेल्या आरोपाचे खंडन करत नगराध्यक्षांच्या गटाकडूनच विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.
भाजपचे उपनगराध्यक्ष उदय देसले, बांधकाम समिती सभापती मनोहर पाटील म्हणाले, नगरपंचायतीचे कामकाज सुरळीत चालावे, यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, विरोधी गटाकडून हुकूमशाहीची भाषा वापरली जात असून, कोणालाही विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार चालविला जात आहे. शहरातील अनेक विकासकामे अचानक बंद पडली असून, नव्याने कार्यादेश दिलेली कामेदेखील सुरू होत नसल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. ही सर्व कामे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल व माजी गटनेते अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर झालेली असतानाही ती कामे होऊ दिली जात नसल्याचे भाजपने म्हटले आहे.
उदय देसले म्हणाले, समोरील गटाचा मनमानी कारभार व असुरक्षित वातावरणात काम करणे शक्य नसल्याचे नमूद करीत प्रकल्पातून माघार घेत असल्याचे ठेकेदाराने स्पष्ट केले असल्याची माहिती दिली. या सर्व घडामोडींमुळे शहराचा विकास खुंटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘जनसेवक होण्याचा दावा करणारे आता मनसेवक झाले आहेत,’ अशी टीका करीत पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे थांबू दिली जाणार नाहीत, असा इशाराही भाजपच्या नगरसेवकांनी दिला.
जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच शहराचे पालकत्त्व ज्यांनी स्वीकारलेले आहेत ते लोकनेते जयकुमार रावल यांनी मागील काळात पाणी योजनेसाठी ‘फेज २’ साठी २३ कोटींचा निधी मंजूर केला असून, हे काम सुरू आहे. तसेच, भूमिगत गटारींसाठी ९५ कोटींचा निधी मंजूर केला असून, त्या कामाचीही लवकर सुरुवात होणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. आतापर्यंत झालेल्या दोन सर्वसाधारण सभेत अनुक्रमे १३ व ३३ विषय होते. यात दोन विषय सोडून सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
संबंधित दोन विषय पाणी योजनेचे फेज २ व भूमिगत गटारी यापूर्वीच मंजूर झाले आहेत. याचे श्रेय कोणी घेतले पाहिजे, असा सवाल करीत भाजपचे नगरसेवक विकास कामाला विरोध करतात हा विरोध आहे का, असाही प्रश्न या वेळी नगरसेवकांनी केला. दरम्यान, नगराध्यक्षा कलावती माळी यांनी विकासकामांमध्ये भाजपकडून अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप केला होता. त्याचे खंडन करीत कोणत्याही निविदांना स्थगिती देण्यात आलेली नाही. मात्र, काही निविदांबाबत शंका उपस्थित झाल्याने फेरनिविदा काढून तातडीने विकासकामे सुरू करावीत, अशी आमची भूमिका असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या वेळी नगरपंचायत गटनेते वंदना परमार, पूनम मराठे, संगीता सोनवणे, अरेफाबी कुरेशी, नगरसेवक सुयोग भदाणे, ज्ञानेश्वर सकट, चेतन परमार, दादा मराठे, चंद्रकांत सोनवणे, अबू कुरेशी, गुलाब सोनवणे आदी उपस्थित होते.