SKD26B04209
शिंदखेडा : शिंदखेडा- वायपूर मार्गावर बस पूर्ववत करण्याच्या मागणीचे निवेदन आगारप्रमुख योगेश्वर शिवदे यांना देताना शिवसेनेचे शानाभाऊ सोनवणे, सर्जेराव पाटील, गिरीश देसले आदी.
---------
विद्यार्थिनींना अपरिचित ठिकाणी उतरवले
-
शिवसेना उबाठाचे पदाधिकारी संतप्त; आगरप्रमुखांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
शिंदखेडा, ता. ५ : धुळेहून शिरपूरकडे जाणाऱ्या एस. टी. बसमधील शालेय विद्यार्थिनींना ठरलेल्या बाभळे बसथांब्यावर न उतरविता परस्पर नरडाणा पोलिस ठाण्याजवळ उतरविल्याप्रकरणी संताप व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकारची चौकशी करून दोषी चालक- वाहकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी शिंदखेडा आगारप्रमुख योगेश्वर शिवदे यांना शुक्रवारी (ता. ४) निवेदन दिले.
बुधवारी (ता. २) हा प्रकार घडला होता. धुळे येथून शिरपूरकडे जाणाऱ्या बसने चांदगड येथील शालेय विद्यार्थिनी प्रवास करत होत्या. त्यांना बाभळे फाट्यावर उतरविणे अपेक्षित असताना बस न थांबविता विद्यार्थिनींना थेट नरडाणा पोलिस ठाण्याजवळ उतरविण्यात आले. विद्यार्थिनींकडे पैसे व मोबाईल नसल्याने त्यांनी बस थांबविण्याची विनंती केली होती. अपरिचित ठिकाणी उतरविल्याने घाबरलेल्या विद्यार्थिनी रडू लागल्या. नरडाणा पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तातडीने मदत करत त्यांना सुरक्षितपणे बाभळे येथे पोहोचवले. पोलिसांच्या या संवेदनशील भूमिकेचे सोनवणे यांनी कौतुक केले. मुलींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा देत सोनवणे यांनी शिंदखेडा- खलाणे-चांदगड- वायपूर मार्गावर पूर्वीप्रमाणे नियमित एस.टी. बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. अन्यथा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.
या वेळी तालुकाप्रमुख गिरीष देसले, सर्जेराव पाटील, नंदकिशोर पाटील, भरत अखडमल, कैलास अखडमल, ज्योती अखडमल, रेखा कोळी, मनीषा अखडमल, अनिता अखडमल, सुनीता अखडमल, संगीता अखडमल, रंजना अखडमल, रेखा अखडमल आदी उपस्थित होते.