युवकांनी तथ्य जाणून मत व्यक्त करावे
राजेंद्र कोळपे : शिंदखेड्यात युवा संमेलन
सकाळ वृत्तसेवा
शिंदखेडा, ता. ९ : युवकांनी समाजमाध्यमांवर व्यक्त होताना कोणत्याही विषयाची सत्यता आणि तथ्य तपासूनच आपले मत मांडावे. युवक हा देशाचा जबाबदार नागरिक असून, त्याच्या मतांचा देशविघातक शक्तींना गैरवापर करता कामा नये, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत सहप्रचारक राजेंद्र कोळपे (राजाभाऊ) यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व युवा भारत फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा संमेलन २०२६’ चे आयोजन एस.एस.व्ही.पी.एस. वरिष्ठ महाविद्यालयात करण्यात आले. त्या वेळी प्रमुख वक्ते म्हणून कोळपे बोलत होते. ‘आजचा युवक हा आजचा युगप्रवर्तक आहे,’ असे सांगत कोळपे यांनी युवकांच्या सामाजिक व राष्ट्रीय भूमिकेवर प्रकाश टाकला. आजचा युवक समाजमाध्यमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपले मत व्यक्त करीत आहे. ही चांगली बाब असली, तरी कोणतीही माहिती किंवा प्रतिक्रिया पुढे पाठविण्यापूर्वी तिची सत्यता पडताळणे गरजेचे आहे. चुकीची माहिती किंवा अपुरी माहिती देशविघातक शक्तींकडून गैरप्रकारासाठी वापरली जाऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
संमेलनास संघाचे जिल्हा संघचालक हितेंद्र जैन, तालुका संघचालक डॉ. सुजय पवार, प्राचार्य डॉ. आशुतोष पाटील, उपप्राचार्य डॉ. विशाल पवार तसेच पिलखोड येथील महंत योगी आदित्यनाथ महाराज उपस्थित होते. महाविद्यालय तालुकाप्रमुख उमेश चौधरी यांनी प्रास्ताविक केले. तुषार कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कल्पेश पारधी यांनी परिचय करून दिला. यश मराठे यांनी आभार मानले.
-------
मातृभाषा, राष्ट्रभाषेचा वापर अभिमानाने करावा
युवकांनी इंग्रजी भाषेचे ज्ञान आत्मसात करावे. मात्र, त्याचबरोबर मातृभाषा आणि राष्ट्रभाषेचा वापरही अभिमानाने करावा. पाश्चिमात्य देश आजही आपल्या मातृभाषेचे जतन करतात. त्यामुळे आधुनिकतेसोबत आपल्या भाषा, संस्कृती आणि मूल्यांचे जतन करण्याची जबाबदारी युवकांची आहे, असेही कोळपे यांनी सांगितले. या वेळी प्रमुख मार्गदर्शक सीए सौरभ मुनोत यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रसंगांतून युवकांनी उच्च विचार आणि उत्तम आचार अंगीकारण्याचे आवाहन केले.