SKD26B04224
पिंपराळ : रात्रीची गस्त घालणारे गौण खनिजविरोश्री पथक.
------------
अवैध गौण खनिज वाहतूक
रोखण्यासाठी पथके कार्यान्वित
शिंदखेडा तालुक्यात उपाययोजना
सकाळ वृत्तसेवा
शिंदखेडा, ता. ९ : तालुक्यातील गौण खनिजाबाबत प्राप्त तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी शरद मंडलिक व तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
८ सप्टेंबरला तालुक्यातील मंडल अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रत्येक मंडल मुख्यालयात बैठे पथक तसेच रात्रगस्त पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. या पथकांमध्ये मंडल अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तलाठी, पोलिस पाटील व कोतवालांचा समावेश करण्यात आला आहे. तालुक्यात रेती, मुरूम किंवा इतर गौण खनिजाची अवैध वाहतूक करताना वाहने आढळल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम ४८ नुसार दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. गोराणे, चिमठाणे, नरडाणा, वर्षी, खलाणे व बेटावद या मंडळांमध्ये विशेष लक्ष केंद्रित करुन अवैध वाहतुकीविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच, संबंधित मंडल अथवा तलाठी सजेच्या कार्यक्षेत्रात अवैध गौण खनिज उत्खनन किंवा वाहतूक आढळून आल्यास संबंधित मंडल अधिकारी व तलाठी यांना जबाबदार धरून शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दिली.