SKD26B04270
शिंदखेडा : गोविंद महाराज गायकवाड यांचा सत्कार करताना नगराध्यक्षा कलावती माळी, राकेश माळी, रजूबाई माळी.
------------
उज्ज्वल भविष्यासाठी व्यसनांपासून दूर राहावे
गोविंद महाराज गायकवाड यांचे भारुडातून तरूणांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
शिंदखेडा, ता. १९ : तरुणाई ही देशाची शक्ती असून, उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, व्यायाम आणि सकारात्मक विचारांची कास धरावी, असे आवाहन राष्ट्रीय प्रबोधनकार व भारुडकार गोविंद महाराज गायकवाड यांनी केले.
संत सावता व्यायाम शाळा प्रेरित युवा गणेश मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या भारुड कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी गोविंद महाराज गायकवाड यांनी भारुडाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, मोबाईलचा वाढता वापर व त्याचे दुष्परिणाम तसेच मुला-मुलींनी पळून जाऊन विवाह केल्यानंतर निर्माण होणाऱ्या सामाजिक व कौटुंबिक समस्यांवर मार्मिक भाष्य केले. अध्यक्षस्थानी शिंदखेड्याच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती सुकलाल माळी होत्या. प्रारंभी संत सावता माळी, छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. संत सावता व्यायाम शाळेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमास पोलिस निरीक्षक मयूर भामरे, गटनेते राकेश माळी, नगरसेविका रजूबाई माळी, सुनीता देसले, राहुल पाटोळे, सुभाष माळी, नगरसेवक प्रा. दीपक माळी व अरुण देसले उपस्थित होते. शिंदखेडा शहरातील सुमारे पाच हजार महिला व पुरुषांची उपस्थिती होती. प्रा. दीपक माळी यांनी प्रास्ताविक केले. विजय जाधव व दिलीप माळी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष राकेश परदेशी, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार, संघटक व सर्व सभासदांनी परिश्रम घेतले.
--------
४८ जवानांचा सन्मान
देशसेवेत शहीद झालेले, सध्या सेवा बजावत असलेले तसेच निवृत्त झालेले संत सावता व्यायामशाळेचे मल्ल अशा सैन्य व पोलिस दलातील ४८ जवानांचा सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. या सत्कारातून तरुणांना देशसेवेची प्रेरणा मिळावी, हा उद्देश असल्याचे या वेळी सांगण्यात आले. गणेशमूर्ती आगमन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘रील स्टार’ स्पर्धेतील विजेते हिमांशू पवार व तुषार सोनवणे यांचाही रोख रक्कम, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.