SKD26B04380
शिंदखेडा : रथ मिरवणुकीत बालाजी महाराजांचा रथ ओढताना परिसरातील भाविक.
--------
‘राधे रमणा, गोविंदा’च्या जयघोषात बालाजी रथोत्सवाला प्रारंभ
आज सायंकाळी पालखीची मिरवणूक; फटाक्यांची होणार आतशबाजी
सकाळ वृत्तसेवा
शिंदखेडा, ता. २६ : आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने उजळलेल्या भव्य रथावर श्री बालाजी महाराजांची मूर्ती विराजमान होताच ‘राधे रमणा गोविंदा, वेंकट रमणा गोविंदा’च्या जयघोषाने शिंदखेडा नगरी दुमदुमली. ढोल- ताशांचा गजर आणि घंटानादात पारंपरिक बालाजी रथोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. शहरासह परिसरातील हजारो भाविकांनी रथाचे दर्शन घेत रथ ओढण्याचा मान मिळविला. परंपरेनुसार आज (ता. २७) सायंकाळी सहाला पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
दुपारी १२ वाजता रथ गल्लीतील श्रीराम बालाजी मंदिरात मठाधिपती मेघश्याम बुवा यांच्या हस्ते श्री बालाजी महाराजांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर राऊळ घराण्यातील हिम्मतसिंह राऊळ यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. परंपरेनुसार व्यंकटेशाची मूर्ती रथावर विराजमान करण्यात आली. दुपारी एक वाजता घंटानाद, ढोल-ताशांचा गजर आणि ‘राधे रमणा गोविंदा, वेंकट रमणा गोविंदा’च्या जयघोषात रथोत्सवाला सुरुवात झाली. रथमार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी श्री बालाजी महाराजांची आरती करून केळ्यांचा नैवेद्य अर्पण केला. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भक्तिमय वातावरणात रात्री उशिरापर्यंत रथ मिरवणूक सुरू होती.
रथावर सेवेकऱ्यांची उपस्थिती
रथावर प्रा. प्रदीप दीक्षित, राहुल जोशी, सुहास जोशी, सोमनाथ पिले, धनंजय गिरासे, हेमंत जोशी, ललित पाठक, नंदकिशोर जोशी, संकेत कुलकर्णी, राम कुलकर्णी, कृष्णकांत गिरासे, देवेंद्र जोशी, मायू जोशी, धनंजय पाठक, अरविंद गिरासे, प्रदीप चतुर्वेदी आदी ब्राह्मण बांधव सेवा देत होते. रथाला गतिमान ठेवणे व त्यावर नियंत्रण राखण्याची जबाबदारी दयाराम माळी, अनिल लोहार, कोमलसिंह गिरासे, जीवन लोहार आणि गिरीश लोहार यांनी सांभाळली. घनकरी म्हणून मोतीराम बडगुजर, बारकू बडगुजर, अशोक बडगुजर, अभिमान मिस्तरी, उमाकांत मिस्तरी, दिलीप गिरासे, दादाभाई गिरासे, भगवान गिरासे, सुरेश माळी आदींनी सहकार्य केले.
महावितरण, पोलिसांचा चोख बंदोबस्त
रथमार्गावरील विद्युत तारांमुळे अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी महावितरणच्या पथकाने विशेष काळजी घेतली. सहाय्यक अभियंता भावेश टेटू यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ तंत्रज्ञ जयेश पवार, सुनील खैरनार, संजय पाटील, राकेश पवार, मुकेश बोरसे, सुनील नगराळे, संतोष अहिरे, पांडुरंग पाटील, विशाल कोळी, प्रदीप बडगुजर, जावेद पठाण, जितेंद्र पाटील आणि राहुल गव्हाणे आदींनी काम पाहिले. पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.