पान दोन ॲंकर
----------------
07258
सटाणा : महाविद्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धेत सहभागी स्पर्धक विद्यार्थी.
सटाणा महाविद्यालयात जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धा उत्साहात
५५ महाविद्यालयांमधील सुमारे ४५० बुद्धीबळपटूंनी नोंदविला सहभाग
सकाळ वृत्तसेवा
सटाणा ता.१९ : बुद्धीबळाच्या पटावरील प्रत्येक चाल ही संयम, चिकित्सक विचार आणि अचूक निर्णयक्षमतेची परीक्षा घेणारी असते. याच बौद्धिक खेळाचा उत्साह सटाणा महाविद्यालयात पाहायला मिळाला. मविप्र संस्थेच्या कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जिल्हा क्रीडा समिती व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धेत जिल्ह्यातील ५५ महाविद्यालयांमधील सुमारे ४५० बुद्धीबळपटूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.
संस्थेच्या महिला संचालिका शालन सोनवणे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिल पाटील होते. भिका सोनवणे, अरुण सोनवणे, प्रल्हाद सोनवणे, जिल्हा क्रीडा समितीचे सचिव प्रा. चेतन आव्हाड, क्रीडा संचालक तथा उपप्राचार्य डॉ. नरेंद्र निकम प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
श्रीमती सोनवणे म्हणाल्या, बुद्धीबळ हा मानसिक व बौद्धिक क्षमतेची कसोटी पाहणारा खेळ आहे. संयम राखून अचूक निर्णय घेतल्यास खेळाडू वर्चस्व निर्माण करू शकतो. प्राचार्य पाटील म्हणाले, बुद्धीबळाप्रमाणेच जीवनातही प्रतिस्पर्ध्याच्या चालीचा अंदाज घेत योग्य डावपेच आखावे लागतात. ६४ घरांचा पट सतत दक्ष राहण्याची शिकवण देतो. स्पर्धेदरम्यान शिवसेना नेते आविष्कार भुसे व ॲड. रमेशचंद्र बच्छाव यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. प्रा. चेतन आव्हाड यांनी प्रास्ताविक केले.
सूत्रसंचालन डॉ. नरेंद्र निकम यांनी, तर आभार प्रा. राहुल सोनवणे यांनी मानले. यावेळी जिल्हाभरातील ४० हून अधिक क्रीडा संचालक उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. नरेंद्र निकम, प्रा. राहुल जाधव, प्रा. भास्कर निकम, प्रा. निलेश शेवाळे, प्रा. निलेश निकम, राजू पगार, अजय पवार, भाऊसाहेब पवार, विजय गुंजाळ, पवन भामरे, ऋषिकेश सोनवणे, शुभम शिंदे, सुधीर पवार यांनी परिश्रम घेतले.