पान दोन
------------
07278
सटाणा : ‘आविष्कार संशोधन’ स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. दीपक सोनवणे, मिलिंद कटारिया, अंजली कटारिया, प्रा. डॉ. संदीप सोनवणे, प्रा. डॉ. महालक्ष्मी मोहन आदी.
डिव्हाईन फार्मसीत ‘आविष्कार’चा उत्साह
५८ संशोधन पोस्टरचे सादरीकरण; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
सटाणा, ता.१७ : विद्यार्थ्यांच्या कल्पनांना संशोधनाची दिशा आणि नवोपक्रमाला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने श्रीशक्ती शैक्षणिक संस्था संचलित डिव्हाईन कॉलेज ऑफ फार्मसी येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समन्वयाने महाविद्यालयीन स्तरावरील ‘आविष्कार संशोधन’ स्पर्धा उत्साहात पार पडली. विविध विषयांवरील तब्बल ५८ संशोधन पोस्टरचे सादरीकरण करण्यात आले. उत्कृष्ट संशोधन प्रकल्पांची जिल्हास्तरीय ‘आविष्कार’ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
संस्थेचे सचिव डॉ. दीपक सोनवणे, विश्वस्त जयसिंग दात्रे, नाशिक येथील रेवे फार्मा कंपनीचे संचालक मिलिंद कटारिया, अंजली कटारिया, एम.ए.टी. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नाशिकचे फार्मास्युटिक्स विभागप्रमुख प्रा. डॉ. संदीप सोनवणे तसेच प्रा. डॉ. महालक्ष्मी मोहन यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
प्राचार्य डॉ. सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात ‘आविष्कार’ स्पर्धेचा प्रमुख हेतू असल्याचे सांगितले. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मेडिसिनल केमिस्ट्री, कृषी व पशुपालन, इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी, वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा, मानविकी, भाषा आणि ललित कला आदी विविध विषयांवर संशोधन प्रकल्प सादर केले. मिलिंद कटारिया, अंजली कटारिया, प्रा. डॉ. संदीप सोनवणे आणि प्रा. डॉ. महालक्ष्मी मोहन यांनी परीक्षक म्हणून प्रकल्पांचे परीक्षण केले.
विविध विभागांतील प्रथम क्रमांक व उपविजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जिल्हास्तरीय ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. श्रावणी जगताप व जिशान तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समन्वयक प्रा. डॉ. खेमचंद सुराणा यांनी परिश्रम घेतले. प्राचार्य डॉ. सुनील महाजन, नॅक समन्वयक प्रा. डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्यासह प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.