बसस्थानकातील स्वच्छतागृहे
मोफत करण्याची मागणी
सिन्नर ः बसस्थानकातील प्रवाशांना १ जूनपासून आगारातील स्वच्छतागृहाची सेवा मोफत सुरू झाली आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण समितीचे अशासकीय सदस्य दत्ता शेळके यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महामंडळाच्या अध्यक्षांना पत्र दिले.
महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तिकिटासोबतच दोन रुपये अधिभार घेऊन सर्व बसस्थानकातील स्वच्छतागृह मोफत केल्याचे जाहीर केले आहे. याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, अशी मागणी केली आहे. प्रत्येक स्थानकात सुलभ स्वच्छतागृहात दर्शनी भागावर सुलभ स्वच्छतागृहाच्या सर्व सुविधा १ जूनपासून मोफत आहे. प्रवाशांनी कोणतेही मूल्य देऊ नये, असा फलक लावावा. त्यावर ठेकेदार, कर्मचारी जबरदस्तीने पैसे मागत असल्यास त्याची तक्रार करावी, संबंधित अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक त्यावर असावा. ठेकेदारांचे काउंटर बंद करून तेथील टेबल खुर्च्यासह काउंटर हलवावे, कोणताही ठेकेदार स्वच्छतागृहाच्या आतील भागात नसावा, मोफत सेवेची सूचना स्थानकातील ध्वनिवर्धकावर दर १५ मिनिटांनी करावी अशा मागण्या केल्या आहेत.