फोटो ः 21536
सिन्नर ः नगरपरिषद कार्यालयात सन्मान सोहळ्यात सहभागी झालेल्या एकल महिला.
----
सिन्नर नगरपरिषदेत
एकल महिलांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. २४ : नगरपरिषद महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय एकल महिला दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उद्योग आणि व्यवसायात यशस्वी भरारी घेणाऱ्या एकल महिलांच्या प्रेरणादायी यशोगाथा जाणून घेत त्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, मुख्याधिकारी अभिजित कदम, आरोग्य सभापती ललिता हांडे, नगरसेविका कांताबाई जाधव, गीता वरंदळ, आशा करपे आणि शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी एकल महिलांच्या समस्या, रोजगार, स्वयंरोजगार, उद्यमशीलता आणि स्त्री-पुरुष समानता या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. तसेच बचत गटात नसलेल्या महिलांना गटांशी जोडण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य सभापती ललिता हांडे यांनी, सिन्नरमधील एकल महिलांचा संघर्ष व यश समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. दरम्यान, सिन्नर शहरातील सर्व एकल महिलांची नोंदणी नगरपरिषद कार्यालयात केली जात असून, महिलांनी आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी केले.
---