फोटो ः 21559
सिन्नर ः दहशत माजविणाऱ्या कोयताविराची पोलिसांनी काढलेली धिंड.
--
दहशत माजविणाऱ्याची पोलिसांनी काढली धिंड
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. २४ : येथील बस स्थानकावर हातात कोयता घेऊन दहशत पसरविणाऱ्या एका संशयिताला सिन्नर पोलिसांनी अटक करून त्याची भरबाजारात धिंड काढली. ज्या ठिकाणी त्याने दहशत माजवली होती, त्याच ठिकाणी पोलिसांनी त्याच्याकडून ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ असे जाहीरपणे वदवून घेतले.
आकाश देविदास गोळेसर (वय २६, रा. भोईगल्ली, गावठा, सिन्नर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने मंगळवारी (ता. २३) दुपारी दीडच्या सुमारास बस स्थानकात हातात कोयता घेऊन धुमाकूळ घातला होता. त्याने सिटीलिंक बसच्या काचेवर कोयता मारून नुकसान केले, चालकाला दुखापत करण्याचा प्रयत्न केला, प्रवाशांना शिवीगाळ केली आणि उपस्थित अधिकाऱ्यांना धमकावले. एवढेच नव्हे तर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांशीही हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा आणला.
पोलिस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन डावखर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड, प्रशांत सहाणे व नवनाथ पवार यांच्या पथकाने त्याला तातडीने ताब्यात घेत त्याच्याकडील कोयता हस्तगत केला आणि त्याची परिसरात धिंड काढत गुंडगिरी मोडून काढली.
--