21570
सिन्नर : टंचाई स्थितीवर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना आमदार माणिकराव कोकाटे.
टंचाई निवारण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करा
आमदार कोकाटे यांच्या विभाग अधिकाऱ्यांना सूचना
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. २६ : तालुक्यात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. अल निनोचे संकट पाहता आगामी तीन महिन्यासाठी पाणी पुरवठा योजना व टंचाई निवारण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करावा. तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांबाबत आढावा घेण्याची सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांच्याशी त्यांनी मोबाईलवरुन संपर्क साधून आवश्यक ते पावले उचलण्याच्या सूचना केल्या.
सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आमदार कोकाटे यांची भेट घेवून टंचाईबाबत मागण्या केल्या. स्थानिक पाणी योजनांची स्थिती अवघड असल्याने भूजल साठे खालावत चालले आहेत. धरणांतील साठाही कमी होत चालला असल्याचे विविध गावांतील माजी सरपंच, माजी उपसरपंच व सदस्यांनी सांगितले.
आमदार कोकाटे यांनी सिन्नर व इगतपुरीतील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचा आढावा घ्यावा, सुचना कोणत्याही स्थितीत सुरु राहतील याबाबत काळजी घ्यावी, कार्यान्वीत असलेल्या योजनांची देखभाल व दुरुस्ती हाती घ्यावी. बंद असलेल्या योजना सुरु करण्याबाबत नियोजन करावे, संभाव्या पाणी टंचाईचे संकट पाहता सर्व योजना सक्षमपणे सुरु ठेवण्याच्या सूचना आमदार कोकाटे यांनी सीईओ पवार यांना केल्या.
जनतेला कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाशी सातत्याने समन्वय ठेवून आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येतील. त्यासाठी आवश्यक ती तयारी केली जाईल, अशी ग्वाही आमदार कोकाटे यांनी यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना दिली.
----------
पुर्वतयारीच्या सूचना
जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने अपेक्षित पुनरागमन केले नाही तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. तसेच खरीप हंगामातील पिकांनाही मोठा फटका बसणार आहे. यामुळे जलसंधारण, पाणी बचत, उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन आणि ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची पूर्वतयारी करणे आवश्यक कोकाटे म्हणाले. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच संभाव्य संकटावर प्रभावीपणे मात करता येणार असल्याचे ते म्हणाले.