पान तीन
------------------
21572
सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीत सिमाच्या बैठकीत उद्योजकांच्या समस्येवर चर्चा करताना भरत जाधव. समवेत सुकुमार नायर, बबन वाजे, सुनीता फाल्गुने.
माळेगाव औद्योगिक वसाहतीत पोलिस चौकी
पोलिस निरीक्षक भरत जाधव यांची ''सिमा''च्या बैठकीत ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. २६ : माळेगाव औद्योगिक वसाहतीसाठी आता स्वतंत्र पोलिस वाहन उपलब्ध करून देण्यात आले असून, जिंदाल कारखान्याच्या सहकार्यातून येथे लवकरच नवीन पोलिस चौकी उभारण्यात येणार आहे. या चौकीमध्ये २४ तास पोलिस मनुष्यबळ तैनात केले जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी दिली. ''सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन'' (सिमा) वतीने आयोजित उद्योजकांच्या विशेष बैठकीत ते बोलत होते.
''सिमा''चे अध्यक्ष सुकुमार नायर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्षा सुनीता फाल्गुने, ''सिमा''चे सचिव बबन वाजे आदी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला ''सिमा''चे सचिव बबन वाजे यांनी औद्योगिक वसाहतीतील सुरक्षाविषयक गंभीर प्रश्न उपस्थित केले. यामध्ये वसाहतीमध्ये वाढलेल्या चोरीच्या घटना आणि कामगारांच्या पगाराच्या दिवशी होणारी लुटमार, रस्त्याने जाणाऱ्या कामगारांचे मोबाईल पळवणाऱ्या चोरांचा वाढलेला सुळसुळाट, वसाहत परिसरात होणारी गांजा व अवैध दारूची सर्रास विक्री. विविध कारणांसाठी उद्योजकांना वर्गणीसाठी दिला जाणारा त्रास या तक्रारी मांडण्यात आल्या.
उद्योजकांच्या तक्रारींची दखल घेत पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगत अवैध धंद्यांना खतपाणी घालणाऱ्या परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाईल. चोरट्यांच्या टोळ्या व अवैध व्यवसायांचे पूर्णपणे उच्चाटन करण्यात येईल. माळेगाव वसाहतीप्रमाणेच मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील समस्यांचीही अशाच पद्धतीने दखल घेऊन तिथेही सुरक्षा वाढवली जाईल. उद्योजकांनी आपल्या कारखाना परिसरासोबतच बाहेरील रस्तेही कव्हर होतील, अशा पद्धतीने सीसीटीव्ही बसवून प्रशासनाला सहकार्य करावे. असेही आवाहन केले. याशिवाय कोणत्याही व्यक्तीकडून त्रास होत असल्यास किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास उद्योजकांनी थेट पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा किंवा ''११२'' या क्रमांकावर त्वरित कॉल करावा असे आवाहन केले.
बैठकीला ''सिमा''चे उपाध्यक्ष विठ्ठल जपे, विश्वस्त मारुती कुलकर्णी, कोषाध्यक्ष राहुल नवले, अरुण चव्हाणके, सुधीर जोशी, मुकेश देशमुख, सतीश नेहे, प्रमोद कुटे, अरुण खालकर, शांताराम दारुंटे, शशिकांत नवले, शरद टर्ले यांच्यासह ''निमा''चे सुधीर बडगुजर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा आणि वसाहतीतील उद्योजक उपस्थित होते.