सिन्नर पान दोन
(मजकूर दोन बाय पंधरा जागेत बसवावा)
फक्त पासपोर्ट फोटो घेणे )
---------------------
साहेबराव बोऱ्हाडे
22579
बंद पडणाऱ्या शाळेचा
कायापालट साहेबराव बोऱ्हाडे
संपत ढोल : सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. ७ : तालुक्यातील वडगावपिंगळा येथील मुठाळ वस्तीवरील जिल्हा परिषद शाळा पटसंख्या कमी असणे, इमारतीचे फुटलेले पत्रे आणि पिण्याच्या पाण्याची दुरवस्था यामुळे थेट बंद पडण्याच्या मार्गावर होती. ग्रामस्थ शाळा बंद करण्याच्या विचारात असतानाच शिक्षक साहेबराव बोऱ्हाडे यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन वेळ मागितला आणि आपल्या ध्येयवेड्या कार्याने शाळेचे रूप पूर्णपणे बदलून टाकले.
बोऱ्हाडे शाळेत रुजू झाले तेव्हा पहिली ते चौथीच्या वर्गांसाठी अवघी १६ पटसंख्या होती. त्यांनी शाळेचा कायापालट करण्याचा ध्यास मनाशी धरला. त्यासाठी प्रथम सिन्नर शहरातील डॉक्टर आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने लोकसहभागातून नवीन पत्रे बसवले, शाळा बोलकी केली, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाक, पिण्याच्या पाण्यासाठी कूपनलिका, पाण्याची टाकी आणि ॲक्वा फिल्टर उपलब्ध करून दिले.
लोकसहभागातून संगणक मिळवून वर्ग डिजिटल करण्यात आले आणि दप्तरमुक्त शाळेचा उपक्रम राबवला गेला. मराठी माध्यमाची ही शाळा सेमी-इंग्रजीत रूपांतरित केल्याने परिसरातील इंग्रजी माध्यमांतील विद्यार्थ्यांनीही या जि. प. शाळेत प्रवेश घेतला. यामुळे अल्प कालावधीतच शाळेची पटसंख्या १६ वरून थेट ४७ वर पोहोचली.
शिक्षणासोबतच बोऱ्हाडे यांनी शेजारील आदिवासी माळीवाड्यातील ग्रामस्थांनाही मोठा आधार दिला. कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी पुण्यातील एका संस्थेकडून ४० कुटुंबांना ३ महिने पुरेल इतके धान्य व वस्तू मिळवून दिल्या. तसेच एका आदिवासी बालकाच्या हृदयाला छिद्र असल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबईत शस्त्रक्रिया घडवून आणत त्याला नवजीवन मिळवून दिले. सध्या साहेबराव बोऱ्हाडे वडांगळी येथे कार्यरत असले, तरी त्यांनी मुठाळ वस्ती शाळेत घडवलेला कायापालट आजही वडगावपिंगळावासीयांच्या स्मरणात आहे.