पान-२ मेन
--------------
SNR26B22618
सिन्नर ः येथील बाजारात पोळ्याच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी आलेल्या विविध वस्तूंनी गजबजलेली बाजारपेठ.
-------------------
बैलपोळ्यासाठी सिन्नरला लाखोंची उलाढाल
------------
आठवडे बाजार फुलला ः सजावटीच्या नानविध साहित्याच्या खरेदीसाठी तालुकाभरातून गर्दी
------------
सकाळ वृत्तसेवा
सिन्न, ता.७ ः बैलपोळा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सिन्नरचा बाजार गजबजला आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या आपल्या लाडक्या सर्जा-राजाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण उत्साहात साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध सजावटीच्या वस्तू खरेदीला प्राधान्य दिले. बैलांना सुंदर आणि आकर्षक रूप देण्यासाठी सिन्नर व परिसरातील ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी बाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
---------
''बैलपोळ्याचा खास बाजार'' म्हणून येथील रविवारचा बाजार तालुक्यात प्रसिद्ध असून, यावेळी बाजारात चांगली उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. रविवारच्या या विशेष बाजारात सकाळपासूनच शेतकऱ्यांची पावले बाजारपेठेकडे वळू लागली होती. पोळा सणाला बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या विविध रंगीबेरंगी आणि नक्षीदार पारंपरिक वस्तूंनी संपूर्ण बाजार सजला होता. बाजारातील नाशिक वेस, भैरवनाथ मंदिर परिसरातील दुकाने या साहित्याने व गर्दीने ओसंडून वाहत होती. ऐन पोळ्याच्या तोंडावर साहित्याचे भाव काहीसे वधारले असले, तरी शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांना सजवण्यासाठी खरेदीचा मोठा उत्साह दाखवला. बैलांच्या शृंगारासाठी या प्रमुख वस्तूंची खरेदी झाली. बैलांच्या गळ्याची शोभा वाढवण्यासाठी पितळी व लोखंडी घुंगरांच्या माळा (चाळ), गळपट्ट्या आणि मोठ्या घंटांच्या माळांना शेतकऱ्यांकडून मोठी मागणी होती. बैलांच्या कपाळावर बांधण्यासाठी मखमली कापड, मणी आणि जरदोजीचे आकर्षक नक्षीकाम केलेली बाशिंगे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होती. बैलांच्या शिंगांच्या टोकावर बसवण्यासाठी प्लॅस्टिक आणि फायबरच्या रंगीत शेंब्या (टोप्या) विविध आकारात उपलब्ध होत्या. बैलांच्या अंगावर टाकण्यासाठी लाल, हिरव्या, पिवळ्या रंगांच्या आणि त्यावर चमकीचे काम असलेल्या रेशमी व सुती झुलींनी बाजारपेठ रंगीबेरंगी झाली होती.
बैलांच्या मापाप्रमाणे झुलींची खरेदी केली जात होती. एक हजार ते आठ हजार रुपये पर्यंत झुलींच्या किमती होत्या. बैलांना नियंत्रित ठेवण्यासाठी आणि ऐटबाज चालण्यासाठी लागणारे सुती व नायलॉनचे मजबूत कासरे, नाकातील वेसण, मोरकी आणि गळ्यात बांधावयाच्या कवड्यांच्या माळा खरेदी करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला. बैलांची शिंगे तासून ती चमकदार बनवण्यासाठी सोनेरी, चंदेरी आणि तांबड्या रंगांचे बेगड (पॉलीश पेपर) तसेच शिंगांना लावण्यासाठी ऑईल पेंट रंगांचे डबे विक्रीस होते.
------------
२०-२ चौकट
साहित्याच्या दरात पंधरा टक्के वाढ
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साहित्याच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तरीही शेतकरी आपल्या लाडक्या बैलांसाठी आनंदाने खरेदी करत आहेत. शेतकऱ्यांनी महागाईची चिंता बाजूला ठेवून सर्जा- राजाच्या शृंगारासाठी केलेल्या या खरेदीमुळे सिन्नरच्या रविवारच्या आठवड्या बाजाराला एक वेगळीच रंगत आली होती. दुपारनंतर बाजारातील गर्दी अधिकच वाढली. काही ठिकाणी वाहतुकीची काही काळ कोंडी झाली असली तरी पोळ्याच्या उत्साहापुढे शेतकऱ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता.
------------