‘रस्त्यावरील विक्रेत्यांना
मर्यादा रेषा आखून द्या’
----------------
सिन्नर, ता.७ ः शहरातील प्रमुख ठिकाणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी फळे व भाजीपाला विक्रेत्यांसाठी लक्ष्मण रेषा (मर्यादा रेषा) नगरपालिकेने आखून द्यावी, विक्रेत्यांनी निर्धारीत लक्ष्मण रेषा ओलांडल्यास दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नामदेव कोतवाल यांनी केली आहे. मुख्याधिकारी अभिजित कदम यांना मागणीचे निवेदन दिले आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तालुक्यातील ११६ गावांची खरेदी विक्रीचे प्रमुख केंद्र म्हणून शहरातील बाजारपेठ ओळखली जाते. वेगाने विस्तारणाऱ्या शहरातील लोकसंख्या एक लाखाच्या पुढे सरकली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील महात्मा फुले पुतळा, वाजे विद्यालय, नवापुल, भैरवनाथ मंदिर परिसर, खासदार पुल, नाशिक वेस, बाजार वेस, गंगावेस, होरायझन स्कुल, सरदवाडी रोडवरील अजिंक्यतारा परिसर, गणेश पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ही उपाय योजना राबवण्याची मागणी कोतवाल यांनी केली आहे. या ठिकाणी भाजीबाजार, फळ विक्रेते व इतर लहान-मोठे व्यवसाय हातगाडे लावुन विक्री व्यवसाय करतात. हे किरकोळ विक्रेते व पाल टाकलेले व्यापारी वाहतुकीला अडथळे निर्माण करत आहेत. येणाऱ्या सणावारांचे दिवस लक्षात घेता संबंधित विक्रेत्यांना शिस्त लावण्यासाठी लक्ष्मण रेषा निर्धारीत करून द्यावी अशी मागणी केली आहे.
---------------