पान तीन मेन
--------------------
22649
सिन्नर : पावसाने ओढ दिल्याने पूर्व भागात सुकू लागलेली पिके.
----------
जिल्ह्यातील ४९ महसूल मंडळे कोरडी
अल्प पावसाने पिकांना ओढ ; ऑगस्टमध्ये ४७ टक्के पाऊस
संपत ढोली : सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. ९ : नाशिक जिल्ह्यात ऑगस्टपासून पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. जिल्ह्यातील ४९ महसूल मंडळात कमीत कमी २२ ते जास्तीत जास्त ३९ दिवसापासून पावसाने दडी मारली आहे तर १३ महसूल मंडळात पावसाचा सर्वाधिक खंड पडला असल्याने हाताशी आलेले पीक आता वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
अनियमित पावसाचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसणार असल्याने बळीराजा चिंतेत आहेत. विशेषतः पावसाच्या खंड पडल्यामुळे सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसणार आहे. ऐन फुलोऱ्यातील पिके सुकू लागल्याने पिके जगवावी कशी ? असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे आहे. विहिरीचीही भूजल पातळी फारशी सुधारलेली नाही. अल्प पाणी असले तरी खंडीत वीज पुरवठ्याला सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
---------
येवला, सिन्नर तालुका सर्वाधिक अडचणीत
येवला तालुक्यातील नगरसुल, पाटोदा, जळगाव या महसूल मंडळात ३९ तर सावरगाव, अंगणगाव, राजापूर, अंदरसुल येथे ३६ दिवसापासून पावसाळा कोरडा आहे. त्याखालोखाल सिन्नरचे सर्व ८ महसूल मंडळे धोकादायक स्थितीत आहेत. याच तालुक्यात पावसाने सर्वाधिक ओढ दिली आहे.
--------
उत्पादन घटण्याची चिन्हे
तब्बल ३९ दिवस पाऊस लांबल्याने ऐन फुलोऱ्यात असलेली सोयाबीनचे पीक अडचणीत आले आहे. कमी ओलाव्यामुळे झाडांची वाढ खुंटणे, फुले व शेंगा सुकणे यामुळे उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होवू शकेल. मका, बाजरी आदी खरीप पिकांचीही स्थिती यापेक्षा वेगळी नाही.
----------
गेल्या महिन्यात ४७ टक्के पाऊस
जूनमध्ये वाट पाहण्यास लावणाऱ्या पावसाने जुलैमध्ये दमदार आगमन केले. नाशिक जिल्ह्यातील जुलैच्या ३०८.९ सरासरीच्या तुलनेत ४२१.९ मिमी म्हणजेच १३६ टक्के पाऊस पडला. त्यामुळे चांगला दिलासा मिळाला. पाऊस केव्हा उघडेल अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र ऑगस्टमध्ये २६६.९ मिमीच्या तुलनेत केवळ १२६.८ मिमी पाऊस पडला. केवळ ४७.५ टक्के पाऊस पडल्यामुळे सरासरी घसरली तर सप्टेंबरच्या नऊ दिवसात सरासरीच्या तुलनेत ३१.४ टक्के पाऊस पडला आहे.
नाशिक जिल्ह्याची स्थिती
जून ते सप्टेंबरची एकूण सरासरी : ८०५.३ मिमी
जून ते ९ सप्टेंबरपर्यंतचा एकूण पाऊस : ६१९.२ मिमी
तालुकानिहाय पावसाची ओढ असलेले महसूल मंडळे
मालेगाव ७
कळवण ३
नांदगाव ७
नाशिक ३
सिन्नर ८
येवला ८
चांदवड ४
देवळा ३
बागलाण ६