नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी जनसुनावणी घ्या
बबन वाजे ः दररोज ४५ ते ५० हजार प्रवाशांची वाहतूक; उद्योगांसाठी थेट रेल्वेची गरज
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. १२ ः नाशिक-पुणे महामार्गावरील सरकारी आकडेवारीचा विचार केल्यास दररोज ४५ ते ५० हजार प्रवाशांची वाहतूक होत आहे. रोज सहा हजार मालवाहू व व्यावसायिक वाहनांची वाहतूक होत असल्याचे सरकारी वाहतूक सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नाशिक-पुणेदरम्यान थेट रेल्वेमार्गाची गरज सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीचे सदस्य व सिन्नर इंडस्ट्रियल ॲन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सिमा)चे सचिव बबन वाजे यांनी व्यक्त केली आहे.
केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक सर्वेक्षणानुसार दररोज सरासरी सात हजार ५७ कार, ५२० सरकारी बस, १८९ खासगी बस आणि ६० मिनी बस या मार्गावरून जात असल्याची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय इतर प्रवासी वाहनांचीही मोठ्या प्रमाणात वाहतूक या मार्गावर होत आहे. सहा हजारांवर मालवाहतूक वाहनांमधून औद्योगिक कच्चा माल, तयार माल, शेतीमाल, किराणा, तसेच इतर व्यावसायिक मालाची वाहतूक केली जाते. सातपूर, अंबड आणि सिन्नर या औद्योगिक पट्ट्यांमधून निर्माण होणाऱ्या मालवाहतुकीच्या दृष्टीने ही आकडेवारी महत्त्वाची आहे.
नाशिकमधील सातपूर व अंबड औद्योगिक वसाहती, तसेच सिन्नरमधील औद्योगिक क्षेत्रे विकसित झाली आहेत. या भागातील उद्योगांचा पुणे, चाकण, राजगुरूनगर, मंचर आणि परिसरातील औद्योगिक क्षेत्रांशी सातत्याने व्यापार व औद्योगिक संपर्क वाढत आहे. हजारो कामगार, अभियंते, आयटी क्षेत्रातील कर्मचारी, व्यापारी, विद्यार्थी, उद्योजक, तसेच शेतकरी आणि कृषीमालाशी संबंधित व्यावसायिक यांची मोठ्या प्रमाणावर ये-जा या मार्गावर होत आहे.
महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या कागदपत्रांमध्ये प्रस्तावित नाशिक–पुणे रेल्वेमार्गामुळे नाशिक, सिन्नर, नारायणगाव, मंचर, खेड, चाकण आणि पुणे या महत्त्वाच्या भागांना जोडणी मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक–पुणे थेट रेल्वे प्रकल्पाला आणखी विलंब करणे योग्य नसल्याचे वाजे यांनी म्हटले आहे.
---
चौकट
काकोडकर समितीने जनसुनावणी घ्यावी
नाशिक–पुणे रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात काकोडकर समितीने नाशिक आणि सिन्नर येथे लवकरात लवकर प्रत्यक्ष जनसुनावणी आयोजित करावी, अशी मागणीही बबन वाजे यांनी केली आहे. जनसुनावणी केवळ औपचारिकता न राहता प्रत्यक्ष जनतेचा आणि उद्योगांचा आवाज ऐकण्यासाठी असावी, असे वाजे यांनी म्हटले आहे.