22727
सिन्नर : नाशिक वेस भागात रस्त्यात दुकान थाटणाऱ्या विक्रेत्यांना समज देवून मागे हटवताना नगरपरिषद कर्मचारी.
सिन्नर शहरात दुकानांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. १६ : गणेशोत्सवाचा आनंद नागरिकांना घेता यावा, शहरातील रस्ते वाहतुकीसाठी मोकळे राहावेत यासाठी रस्त्यात दुकान थाटून भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना नगर परिषदेकडून समज देण्यात आली. तसेच काही दुकाने मागे घेण्याची सूचना करण्याबरोबरच अडथळा ठरणारे दुकाने हटविण्यात आली.
नगराध्यक्ष विठ्ठल उगले, मुख्याधिकारी अभिजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मुलन विभागाने ही कारवाई केली. कारवाईत नाशिक वेस परिसरातील भाजी बाजार, जूना बैल बाजार रस्ता गंगावेस परिसरातील अतिक्रमण, हातगाड्या तसेच वाहतुकीस अडथळा ठरणारे साहित्य बाजूला करण्यात आले. नाशिक वेस ते गंगा वेस, प्रताप टाँकीज मार्ग, बाजार वेस परिसरात विक्रेत्यांनी दुकानेथाटून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अडथळे केले होते. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांसह गणेशभक्तांना ये-जा करताना अडचण होत होती. त्यामुळे नगर परिषदेने कारवाई केली. याबरोबरच शहरातील भैरवनाथ मंदिर परिसर, नेहरू चौक आदी ठिकाणीही अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले.
गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळणे, भाविकांची सुरक्षितता आणि नागरिकांना शहरातील गणेशोत्सवाचा आनंद मुक्तपणे घेता यावा, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. अतिक्रमण निर्मुलन विभागाचे अजित शेदवळ, अमित रायते यांच्या उपस्थितीत पथकाने ही कारवाई केली.