पुतळेवाडी दूध पावडर साठा प्रकरणात
दोन अधिकाऱ्यांची कर्तव्यात कसूर
अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक विभागाचा अहवाल
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. २१ : पुतळेवाडी (ता. सिन्नर) येथे १७ लाखांच्या दूध पावडर साठा आढळून आलेल्या प्रकरणात नेमून दिलेले कायदेशीर कर्तव्य पार पाडण्यात कसूर केल्याचा ठपका अन्न व औषध प्रशासनाच्या दोन अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त दिनेश तांबोळी आणि अन्नसुरक्षा अधिकारी संदीप तोरणे यांच्याविरोधात शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, नाशिक विभागाने याबाबतचा अहवाल आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे पाठविला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार भाऊसाहेब बैरागी यांनी मुख्य सूत्रधाराविरोधात अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करत प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिस आयुक्त तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. दूध भेसळीची माहिती देऊनही त्याची दखल घेतली नसणे, तसेच तक्रारदाराच्या सहकाऱ्यांना धमकावले जात असल्याच्या तक्रारींचाही त्यात समावेश होता.
या तक्रारींच्या अनुषंगाने नाशिक विभागाकडून अहवाल मागविण्यात आला होता. त्यानंतर तक्रारदारासह संबंधितांचे जबाब नोंदविण्यात आले. सहाय्यक आयुक्त एम. यू. माने यांनी केलेल्या चौकशीअंती आयुक्तांना अहवाल सादर केला.
तांबोळी आणि तोरणे यांनी नेमून दिलेले विहित कायदेशीर कर्तव्य पार पाडण्यात जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सर टाळाटाळ केल्याचे तसेच कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आल्याचे अहवालात नमूद आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ८ अन्वये दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात येत असल्याचे माने यांनी अहवालात स्पष्ट केले आहे.
मुख्य सूत्रधाराविरोधात पूर्वीही कारवाई
पुतळेवाडी येथील दूध पावडर साठ्यावर जुलैमध्ये छापा टाकण्यात आला होता. संबंधित आस्थापनेशी निगडित हेमंत पवार यांच्यावर यापूर्वीही दूध भेसळीप्रकरणी कारवाई झाली होती. त्यामुळे त्याच्या आस्थापनेविरोधात अधिक ठोस कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, ती करण्यात आली नसल्याचेही माने यांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.