गोवंशाची चोरटी वाहतूक
करणाऱ्या १८ संशयितांना ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
सोग्रस, ता. ९ : चांदवड तालुक्यातील मंगरूळ फाट्यावर शनिवारी (ता. ५) पहाटे कत्तलीच्या हेतूने १८ पिकअप जीपमधून ४५ गोवंशीय जनावरांची चोरटी वाहतूक करणाऱ्या १८ संशयितांना चांदवड पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत १८ पिकअप जीप व ४५ गोवंशीय जनावरे असा एकूण ५५ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चांदवड-तळवाडे रस्त्यावरून गोवंशीय जनावरांची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी मंगरूळ फाट्यावर १८ पिकअप जीप अडवून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहनांची तपासणी केली असता प्रत्येक वाहनात जनावरे निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. या जनावरांची किंमत सुमारे दीड लाखाचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी वाहनचालक गणेश मधुकर शेवरे, नंदू वाघू शिंदे, जगदेव दत्तू शेवरे, योगेश गुणाजी बंडवे, गणेश विठ्ठल गोकुळे, मुरलीधर महादू भोई, भास्कर पुंडलिक दिघे, दिनकर जयराम गांगोडे, पंकज प्रभाकर पवार, ज्ञानेश्वर सुखदेव गुंजाळ, मंगेश दीपक गायकवाड, रोशन खंडेराव आहेर, राजेंद्र विष्णू धनाईत, नवनाथ रघुनाथ पवार, हेमराज रामदास कहाने, दिनेश रमेश घुले, अभिमन्यू त्र्यंबक पवार व दीपक सीताराम खरे यांना ताब्यात घेतले. संशयितांकडे जनावरांच्या वाहतुकीची परवानगी, खरेदी-विक्रीची कागदपत्रे, वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र तसेच जनावरांच्या मालकीबाबतची माहिती मागविण्यात आली. मात्र, त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे किंवा ठोस माहिती मिळाली नाही.
ही कारवाई गोरक्षक भरत सूर्यवंशी, अक्षय शिरसागर, मेघराज पवार व किरण सूर्यवंशी यांच्या मदतीने करण्यात आली. कारवाईनंतर जप्त केलेली गोवंशीय जनावरे मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथील गोशाळेत पाठविण्यात आली. पोलिस कर्मचारी सदानंद वानखेडे यांनी चांदवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पुढील तपास पोलिस कर्मचारी अनिल शिरसाठ करीत आहेत.