फोटो -
सटाणा : कै. नंदकिशोर सोनवणे यांच्या स्मरणार्थ दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करताना नगराध्यक्ष हर्षदा पाटील, नगरसेवक राहुल पाटील साहेबराव सोनवणे, काका रौंदळ, दत्तू सोनवणे.
कै. सोनवणे यांच्या स्मृत्यर्थ
पाण्याच्या टँकरचे लोकार्पण
----------
दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य
सकाळ वृत्तसेवा
सटाणा, ता.२३ : येथील माजी नगराध्यक्ष कै. नंदकिशोर सोनवणे यांच्या स्मरणार्थ शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांच्या हस्ते पिण्याच्या पाण्याचे लोकार्पण करीत दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिठाईचे वाटप करण्यात आले.
कै. नंदकिशोर (नंदू अण्णा) सोनवणे यांच्या ६४व्या जयंती दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (ता.२३) विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
‘समाजसेवा हीच खरी लोकसेवा’ हा विचार आयुष्यभर जपत सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी राहिलेल्या कै. नंदकिशोर सोनवणे यांच्या कार्याचा आदर्श आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा हर्षदा राहुल पाटील यांनी केले. काकासाहेब भामरे निवासी दिव्यांग कल्याण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, मिठाईचे वाटप करून त्यांना भोजन देण्यात आले. या वेळी सोनवणे परिवारातर्फे पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे लोकार्पण करण्यात आले. कै. सोनवणे यांनी सटाणा येथील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनचे व्हाइस चेअरमन, सटाणा बाजार समितीचे संचालक तसेच सटाणा ग्राहक सहकारी संस्थेचे चेअरमन यांसह विविध पदे भूषविली होती. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत उपस्थितांनी स्मृतींना उजाळा दिला.
कार्यक्रमास नगरसेवक राहुल पाटील, माजी नगरसेवक साहेबराव सोनवणे, बाळासाहेब रौंदळ, किशोर कदम, डी. डी. सोनवणे,अंबादास देवरे, कैलास पगार, योगेश भदाणे, सुनील निकम आदींसह नागरिक उपस्थित होते.