पान-३
UML26B01540
शेंडेपाडा ः येथे झालेल्या शिक्षण परिषदेत मार्गदर्शन करताना ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे. शेजारी मुख्याध्यापक.
-----------
३६-३
आनंदी शिक्षकच घडू शकतो आनंदी विद्यार्थी
---------
उत्तम कांबळे ः शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांचा मिश्कील शैलीत ऊहापोह
---------
सकाळ वृत्तसेवा
उमराळे, ता.१० ः विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंद नसेल तर त्याच्या हातातील पुस्तक निरर्थक ठरते. शिक्षणाचा केंद्रबिंदू गुण, परीक्षा नव्हे तर आनंदी विद्यार्थी असला पाहिजे, आनंदी शिक्षकच आनंदी विद्यार्थी घडवू शकतो असे परखड प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत उत्तम कांबळे यांनी केले.
हरसूल केंद्राचे केंद्रप्रमुख संदीप ससाणे यांच्या ‘आनंददायी शिक्षण परिषदे’च्या संकल्पनेतून वायघोळ, बेलपाली व शेंडेपाडा जिल्हा परिषद शाळांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण परिषद झाली. ‘आनंद म्हणजे काय?’ या विषयावर बोलताना कांबळे यांनी शिक्षकांशी संवाद साधत शिक्षण व्यवस्थेतील गंभीर प्रश्नांना मिश्कील शैलीत हात घातला.
‘आपण शिक्षक आनंदी आहोत का? विद्यार्थी शाळेत आनंदाने येतो का?’ या प्रश्नांनी त्यांनी उपस्थितांना आत्मपरीक्षणास भाग पाडले. शाळा म्हणजे केवळ पाठ्यपुस्तक, परीक्षा आणि गुणांचे केंद्र नसून शिकण्याचा आणि व्यक्तिमत्त्व फुलविण्याचा आनंदोत्सव असावा, असा संदेश त्यांनी दिला. त्यांच्या विनोदी शैलीने सभागृहात हास्याचे फवारे उडाले; मात्र त्याचवेळी शिक्षकांच्या मनात अंतर्मुख करणारे विचारही रुजले. तत्पूर्वी स्वयंसेवी संस्थांचे उपक्रम, मुलींचे शिक्षण व उपस्थिती, निपुण भारत, अध्ययन निष्पत्ती, मासिक नियोजन, शाळा व्यवस्थापन समिती, पीजीआय इंडिकेटर, नवोपक्रम स्पर्धा आदी विषयांवर पाच सत्रांत मार्गदर्शन झाले.
गटशिक्षणाधिकारी प्रशांत वडनेरे यांनी शुभेच्छा दिल्या. श्री. कांबळे यांचे केंद्रप्रमुख ससाणे यांनी वृक्ष, शाल व वारली चित्रफ्रेम देऊन स्वागत केले. विठ्ठल लहारे यांनी सूत्रसंचालन केले. राज आहेर यांनी आभार मानले.
------------------