VNI26B12295
वणी : बहुजन हक्क निर्धार परिषदेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर
--------------
शिक्षणाचे खासगीकरण हे बहुजनांना प्रवाहाबाहेर ठेवण्याचे षडयंत्र
----------------
सुजात आंबेडकर ः केंद्र सरकारच्या शिक्षणविषयक धोरणांवर टिका, वणीत बहुजन हक्क निर्धार परिषद
------------
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता. १५ : शिक्षण हा सर्वसामान्यांचा मूलभूत अधिकार आहे, मात्र सरकारने तो भांडवलदारांच्या घशात घातला आहे. शिक्षणाचा बाजार मांडून गरीब, शेतकरी आणि कामगार वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा एक अप्रत्यक्ष प्रयत्न असल्याची जोरदार टिका वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी येथे केली.
---------------
वंचित बहुजन आघाडीच्या दिंडोरी तालुक्यातर्फे आयोजित बहुजन हक्क निर्धार परिषद शुक्रवारी (ता.१५) वणी येथील खुशी बँक्वेट हॉलमध्ये झाली, त्याप्रसंगी ते बोलत होते. बहुजन समाजाचे हक्क, सामाजिक न्याय, संविधानिक मूल्यांचे संरक्षण आणि संघटनात्मक बांधणी या विषयांवर मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले.
-----------------
श्री. आंबेडकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार प्रहार केला. शिक्षण क्षेत्राच्या वाढत्या खासगीकरणावर त्यांनी चिंता व्यक्त केली. संविधानिक मूल्यांवर आधारित नवे लोकशाहीमूलक राजकारण उभे करण्याची वेळ आता आली आहे. कार्यकर्त्यांनी गावपातळीवर संघटन मजबूत करून पक्षाची ताकद वाढवावी.
राज्य प्रवक्त्या दिशापिंकी शेख यांनी आक्रमक शैलीत बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक विषमतेच्या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले. ‘सरकारची धोरणे ही आदिवासी, मुस्लिम, बौद्ध आणि ओबीसी समाजासाठी घातक ठरत आहेत. बहुजन समाजाला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यासाठी संविधानिक संस्थांवर दबाव आणला जात आहे असा आरोप त्यांनी केला. महिलांना मोठ्या संख्येने राजकीय चळवळीत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी दिंडोरी तालुक्यातील स्थानिक प्रश्नांना वाचा फोडली. तालुक्याला स्थानिक मंत्री लाभले असूनही रस्ते, पाणी, आरोग्य आणि रोजगारासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. माजी उपसरपंच किरण गांगुर्डे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बहुजन समाजाच्या महत्त्वावर भाष्य केले. युवा आघाडीचे जिल्हा महासचिव संविधान गांगुर्डे यांनी परिषदेची भूमिका स्पष्ट करताना सामाजिक न्यायाच्या लढाईचा निर्धार व्यक्त केला. परिषदेच्या यशस्वितेसाठी बाळासाहेब शेजवळ (तालुकाध्यक्ष), प्रशांत अहिरे (जिल्हा उपाध्यक्ष), विकी दुर्धवळे (युवा महासचिव), तुषार मोरे (शहराध्यक्ष), संकेत गांगुर्डे, समाधान शिरसाठ, विशाल गांगुर्डे, दादा मोरे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
-----------------