पान चार
------------------
12878
मुंबई : पालकमंत्री गिरीश महाजन यांची सप्तशृंगी गडावरील बसस्थानकाबाबत माहिती देताना नितीन पवार यांच्यासह गडावरील पदाधिकारी व ग्रामस्थ.
सप्तशृंगगडावर कायमस्वरूपी बसस्थानकासाठी १५ कोटी मंजूर
आमदार नितीन पवारांसह शिष्टमंडळाने घेतली गिरीश महाजन यांची भेट
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता. ४ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगगड येथे अद्ययावत व कायमस्वरूपी बसस्थानक उभारण्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भाविक व स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी शिवालय तलाव परिसर किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाजवळील ७१ गुंठे जागेत हे बसस्थानक उभारावे, अशी मागणी आमदार नितीन पवार यांच्या मार्गदर्शनाखालील शिष्टमंडळाने पालकमंत्री तथा सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.
या वेळी आमदार पवार यांच्यासह प्रशासक रमेश जाधव, माजी उपसरपंच संदीप बेनके, राजेश गवळी, व्यापारी असोसिएशनचे अजय दुबे, प्रकाश कडवे आणि तुषार बर्डे आदी उपस्थित होते.
सप्तशृंगगडावर चैत्रोत्सव, नवरात्रोत्सव, कावडयात्रा यांसह विविध धार्मिक उत्सवांना लाखो भाविकांची गर्दी होते. कळवण, नाशिकसह मुक्ताईनगर, सुरत, श्रीगोंदा, तुळजापूर आदी आगारांच्या बसेस गडावर नियमित येतात. मात्र, सध्याचे बसस्थानक अत्यंत लहान असून तिथे अतिक्रमणांमुळे दुरवस्था झाली आहे.
शिवालय तलाव परिसरात बसस्थानक झाल्यास भाविकांना स्नान करून थेट मंदिराकडे जाणे सोयीचे होईल. तसेच गडावरील वाहतुकीला शिस्त लागू शकेल. रोप वे सुरू झाल्यानंतर स्थानिक व्यवसायावर परिणाम झाला असून, बसस्थानक या परिसरात झाल्यास स्थानिक बाजारपेठेला चालना मिळेल, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. यासंदर्भात ग्रामसभेत ठरावही करण्यात आले आहेत.
---------
अधिकाऱ्यांना बैठक घेण्याचे आदेश
ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबईत पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन गडाचा नकाशा दाखवत योग्य जागेची मागणी केली. पालकमंत्र्यांनी या प्रश्नाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांची दोन दिवसांत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत.